Headlines

वंचित, दिव्यांग मुलांनी ढोल-ताशांच्या गजरात साजरी केली ‘आपली दहिहंडी’:शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने आयोजन केले; शिवकन्या बेळगे यांना माता यशोदा सन्मान




पुणे येथे वंचित, दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी ‘आपली दहिहंडी’ हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने हा उपक्रम आयोजित केला होता. धर्मवीर शंभूराजे अनाथाश्रमातील विशेष मुला-मुलींनी ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. सोमवार पेठेतील शाहिरी भवन गुरुकुलाच्या प्रांगणात हा उत्सव साजरा झाला. पारंपरिक बँडचे सूर, ढोल-ताशांचा गजर आणि गोविंदांच्या जयघोषाने वातावरण उत्साहाने भारले होते. या उत्सवी वातावरणात विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. यावेळी विशेष मुलांचे संगोपन करणाऱ्या शिवकन्या अमृत बेळगे यांचा ‘स्व. प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ माता यशोदा सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनच्या अध्यक्ष डॉ. शुभदा जठार यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मान सोहळ्यानंतर गोविंदांनी दहीहंडी फोडली. बँडच्या तालावर विशेष मुलांनी मनसोक्त नाच करत आपला आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला डॉ. मिलिंद भोई, बाळासाहेब पाटोळे, रुपाली देशपांडे, अरुणकुमार बाभुळगांवकर, होनराज मावळे आणि नंदिनी देवकर उपस्थित होते. आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी सांगितले की, दहीहंडी हा केवळ एक उत्सव नाही, तर आनंद वाटण्याची आणि समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याची परंपरा आहे. वंचित आणि विशेष मुलांना या उत्सवाचा आनंद घेता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, या उद्देशाने ‘आपली दहिहंडी’ हा उपक्रम मागील २४ वर्षांपासून सातत्याने आयोजित केला जात आहे. दहीहंडी फोडल्यानंतर सहभागी मुलांसाठी पुरणपोळीचे जेवण आयोजित करण्यात आले होते. तसेच गोपाळकाल्याच्या निमित्ताने संबंधित संस्थेला शिधा देखील देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *