![]()
पुण्यात जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशनने ‘अभिनव बालगोपाळ सायकल दहीहंडी’ उपक्रमाचे आयोजन केले होते. शुक्रवार पेठेतील पंचमुखी मारुती मंदिराजवळ अनोख्या सायकल दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने ३०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, उत्सव हे सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी असतात. सणांच्या माध्यमातून आपण आपला सामाजिक वारसा जपायला हवा. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सण साजरे करण्याची परंपरा आपण कायम ठेवली पाहिजे. या कार्यक्रमाला इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, अक्कलकोट राजघराण्याचे वंशज श्रीमंत मालोजीराजे तिसरे, भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. वर्षा डहाळे, नगरसेवक अविनाश बागवे, गौरव बोराडे आणि जेधे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कान्होजी दयानंद जेधे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जेधे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कान्होजी जेधे यांनी सांगितले की, सायकल दहीहंडीची संकल्पना राबवणारे आमचे मंडळ पहिले आहे. जन्माष्टमी हा बाळगोपाळांचा सण असल्याने आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही हा अनोखा उत्सव साजरा करण्याचे ठरवले. यंदा सायकल हंडीचे हे तिसरे वर्ष असून, आतापर्यंत ३०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. शाळेत जाण्यासाठी दळणवळणाची सोय उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील माळीण, अंबसरी बुद्रुक, शिरोली, नारायणगाव, ओझर, भीमाशंकर, शिरोली खुर्द या अतिदुर्गम भागातील गावांसह पुण्यातील वस्ती भागातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते. मागील दोन वर्षांत भोर, वेल्हे, मुळशी, मावळ या गावांतील मुलांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी बाळगोपाळांच्या हस्ते सायकल दहीहंडी फोडण्यात आली. नादब्रम्ह आणि तालचक्र ढोलपथकांनी आपल्या वादनाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
Source link
300 गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप:जेधे सोशल आणि इंद्राणी बालन फाउंडेशनने सायकल दहीहंडीतून केली मदत