Headlines

दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला:गुरुपौर्णिमेचे औचित्य अन् 'रयत शिक्षण संस्था'चा विषय, वळसे पाटलांचे स्पष्टीकरण




महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार आणि शरद पवार गट केंद्र सरकारला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये सामील होणार, अशा चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. या सर्व घडामोडी चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या हायप्रोफाइल भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दिलीप वळसे पाटील हे आज दुपारी शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. आज गुरुपौर्णिमा असल्याने त्यांनी शरद पवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी कोणत्याही राजकीय चर्चेचा दावा फेटाळून लावला. नेमके काय म्हणाले दिलीप वळसे पाटील? दिलीप वळसे पाटील म्हणाले, “आजची भेट ही पूर्णपणे अराजकीय होती. रयत शिक्षण संस्थेच्या काही प्रलंबित प्रश्नांसंदर्भात ही पूर्वनियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भागीरथ शिंदे आणि मी उपस्थित होतो. आज गुरुपौर्णिमा असल्याने पवार साहेबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही आणि तसा प्रश्नच उद्भवत नाही.” दिल्लीत तटकरेंची मोदींशी भेट गेल्या काही दिवसांपासून दिल्ली ते महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. विकासकामांच्या संदर्भात ही भेट झाल्याचे तटकरेंनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्पष्ट केले होते. शरद पवारांचीनी घेतली होती पंतप्रधानांची भेट यापूर्वी शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शेतकरी समस्या आणि जलव्यवस्थापन यांवर पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे पवारांनी त्यावेळी सांगितले होते. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार गटाचे प्रमुख चेहरे एकापाठोपाठ एक पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि थेट शरद पवारांच्या संपर्कात येत असल्याने दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नाने जोर धरला आहे. वळसे पाटलांनी ही भेट ‘रयत’च्या कामासाठी असल्याचे सांगितले असले, तरी ऐन राजकीय वातावरणात पार पडलेल्या या बैठकीचे गूढ कायम आहे. हे ही वाचा… NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ:ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *