![]()
सिडको गोलवाडी महानगर-४ मधील वीज रोहित्राच्या कॉपर वायरच्या चोरीला तब्बल ३ महिने उलटून गेले. अद्याप रोहित्राची दुरुस्ती केली नाही. महावितरण, सिडको प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यात केवळ जबाबदारी ढकलत आहेत. महावितरणने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आणि विद्युत मीटर जारी केले असतानाही गेल्या ३ महिन्यांपासून नागरिकांना विजेपासून अंधारात राहावे लागत आहे. परिणामी, नागरिकांनी आता थेट न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. सिडको महानगर ४ गोलवाडी हा भाग शहराला लागूनच आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निवासस्थान याच भागात असून तेथे २४ तास पोलिसांचा खडा पहारा असतो. पालकमंत्र्यांच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर, सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ मार्च २०२६ च्या रात्री चोरट्यांनी गटाने येत ट्रान्स्फॉर्मरमधील ७ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि ऑइलची धाडसी चोरी केली. परिसरात विजेचे साहित्य चोरीला जाण्याची ही चौथी घटना आहे. चोरी टाळण्यासाठी घाईने जोडण्या परिसरात चोरीचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे करत महावितरण आणि सिडकोने प्रक्रिया अर्धवट असतानाच घाईघाईत वीज जोडण्या दिल्याचा अजब दावा महावितरणने केला आहे. चोरी झाल्यानंतर २४ तासांत साधी तक्रारही नोंदवली गेली नव्हती, मात्र आता सातारा पोलिसांना लेखी तक्रार दिल्याचा दावा महावितरण करत आहे. कंत्राटदाराने जबाबदारी झटकली सिडकोत पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंत्राटदाराने आपली जबाबदारी झटकली आहे. महावितरणकडे मालमत्ता हस्तांतरित झाल्याचा दावा कंत्राटदार करत असला, तरी चोरी झाल्यानंतर कंत्राटदाराच्या माणसांकडून घटनास्थळावरील उर्वरित साहित्य जमा केले जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कंत्राटदाराची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चोर, नशेखोर, जुगाऱ्यांचा अड्डा गोलवाडी परिसर आणि पैठण-अहिल्यानगर लिंक रोड सध्या चोर, नशेखोर, जुगारी आणि तळिरामांचा मुख्य अड्डा बनला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिस आणि यंत्रणा अपयशी ठरली आहे. सौरऊर्जा ग्राहकांना भुर्दंड परिसरातील सुभाष नरोडे यांनी लाखो रुपये खर्च करून ५ केव्ही क्षमतेची सौरऊर्जा योजना मंजूर करून घेतली. महावितरणने मीटर तर दिले, मात्र गेल्या ३ महिन्यांपासून वीज पुरवठाच नसल्याने सौरऊर्जेची वीज महावितरणपर्यंत पोहोचू शकत नाही. यंत्रणा बंद असल्याने नागरिकांनी गुंतवलेले लाखो रुपये वाया गेले आहेत. दंडात्मक कारवाईची मागणी ग्राहकांनी नियमित कर आणि बिल भरूनही त्यांना अंधारात राहावे लागत असल्याने या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तोडगा काढला जाईल गोलवाडीसंबंधी सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. वीज यंत्र चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सिडको प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. महावितरण, सिडको प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्यात येईल. – भुजंग गायकवाड, प्रशासक, सिडको.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:रोहित्राचे वायर लंपास, मात्र दुरुस्ती केली नसल्याने गोलवाडी महानगर-4 मध्ये 3 महिन्यांपासून अंधार