Headlines

दुधड शिवारात शेवगा येथील 17वर्षीय विद्यार्थ्याचा पोटावर वार करून खून:मित्राच्या बहिणीला का छेडतोस वादाचे पर्यवसान हत्येत‎




“तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?” या संशयातून झालेल्या वादाचे पर्यवसान एका १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येत झाले. अनिकेत अरुण राठोड ( १७, रा. शेवगा, ता. छत्रपती संभाजीनगर) या विद्यार्थ्याची धारदार चाकूने पोटात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (२९ मे) सायंकाळी दुधड-लाडसावंगी मार्गावरील दुधड शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्रीकांत विलास राठोड (२०) व अमोल संजय चव्हाण (दोघे रा. शेवगा) यांचा समावेश आहे. तर मुख्य आरोपी ओमकार मधुकर ताकपिरे (रा. फेरणजळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) हा फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मृत अनिकेत हा रोटेगाव (ता. वैजापूर) येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. परीक्षा सुरू असल्यामुळे तो सध्या शेवगा येथून ये-जा करीत होता. नातेवाइकांचा आक्रोश अनिकेत याच्यावर शनिवारी दुपारी शेवगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या मुलाच्या अकाली निधनाने आई-वडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अनिकेतच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. एका होतकरू विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. काही तासांत दोन आरोपींना केली अटक घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे तसेच अंगुलीनिर्देश विभागाच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत निकाळजे, गणेश वाघ, शिवाजी मदेवाड, विजयसिंह जारवाल, संतोष चव्हाण, सोपान डकले, संतोष टिमकीकर, सुनील लहाने, विठ्ठल चव्हाण, दादासाहेब ढवळे, जयसिंग नागलोत यांच्या स्वतंत्र दोन पथकांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. अवघ्या काही तासांत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. फरार आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास निरीक्षक राजपूत यांनी व्यक्त केला. गेल्या महिनाभरापासून ओमकार ताकपिरे हा स्वप्निल चांदणे यांच्या माध्यमातून अनिकेतला फोन करून शिवीगाळ व धमक्या देत होता. “तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?” असा आरोप त्याच्यावर करण्यात येत होता. मात्र संबंधित मुलगी कोण आणि तक्रार नेमकी काय याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नव्हती. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्ग परिसरात दोन्ही गटांची भेट झाली होती. त्या वेळीही वाद झाला होता. “तुला सोडणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अनिकेतला शेवगा-लाडसावंगी फाटा रस्त्यावरील दुधड शिवारात बोलावण्यात आले. तेथे ओमकार ताकपिरे, श्रीकांत राठोड आणि अमोल चव्हाण यांच्यासोबत त्याचा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी धारदार चाकूने अनिकेतच्या पोटात वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, करमाड येथे दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी मृताचा मोठा भाऊ कुणाल अरुण राठोड यांच्या फिर्यादीवरून ओमकार ताकपिरे, श्रीकांत विलास राठोड, अमोल संजय चव्हाण यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *