Headlines

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणखी 2 हजारांची मदत मिळणार?:पहिल्या टप्प्यात 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर 5 हजार जमा; हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता




राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी 2 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार रुपयांची अग्रीम मदत वितरित केली होती. आता या मदतीचा दुसरा हप्ता म्हणून 2 हजार रुपये देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यांवर दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होऊ शकते. राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात आली. दिवाळीपूर्वी सुमारे 1 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ही रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र, अद्यापही जवळपास 10 लाख शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न होणे, शेतकरी ओळख क्रमांक नसणे, सामाईक शेतजमिनीची नोंद तसेच मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी महसूल दप्तरी नोंदणी न करणे, अशा विविध कारणांमुळे या शेतकऱ्यांच्या खात्यांवर मदतीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. राज्यात एकूण सुमारे 1 कोटी 71 लाख शेतकरी आहेत. त्यापैकी 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक काढला आहे. दुष्काळी तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे 1 कोटी 10 लाख असल्याचे सांगितले जाते. यातील जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील मदत मिळाली असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हिवाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळी मदतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 5 हजार रुपये देण्यात आले असले, तरी वाढत्या शेती खर्चाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त मदतीची मागणी होत आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला किंवा सभागृहात दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री यासंदर्भात घोषणा करू शकतात. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्राकडे 48 हजार कोटींचे प्रस्ताव दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे यापूर्वी दोन टप्प्यांत आर्थिक मदतीचे प्रस्ताव पाठवले होते. पहिल्यांदा 17 हजार कोटी रुपयांचा, तर त्यानंतर 31 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला होता. या दोन्ही प्रस्तावांद्वारे राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) मदत वितरणाच्या निकषांमध्ये केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सुधारित निकषांनुसार राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती आणि कोणत्या स्वरूपात मदत देता येईल, याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार सुधारित प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या आठवडाभरात हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सुधारित निकषांमुळे राज्याला अधिक मदत मिळण्याची शक्यता असून, त्याचा फायदा बाधित शेतकऱ्यांना होऊ शकतो. ई-केवायसी पूर्ण केल्यास रखडलेली मदत मिळणार पहिल्या टप्प्यातील 5 हजार रुपयांची अग्रीम मदत अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील सुमारे 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे मदत जमा झालेली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार मदतीची रक्कम जमा होऊ शकते. पात्र शेतकऱ्यांची निश्चिती करताना कर्जमाफीची रक्कम वितरित झालेली कर्जखाती, नमो शेतकरी महासन्मान निधीची खाती, शेतकरी ओळख क्रमांक आणि महसुली नोंदी अशा विविध माहितीचा आधार घेण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंगल यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष हिवाळी अधिवेशनातील सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे. दुसऱ्या हप्त्याच्या 2 हजार रुपयांची घोषणा झाल्यास पहिल्या टप्प्यातील 5 हजार रुपयांसह शेतकऱ्यांना एकूण 7 हजार रुपयांची अग्रीम मदत मिळू शकते. मात्र, दुसऱ्या हप्त्याबाबत सरकारची अधिकृत घोषणा आणि वितरणाचे वेळापत्रक जाहीर होणे अद्याप बाकी आहे. दुष्काळी मदतीची सद्यस्थिती दुष्काळी तालुके : 304 राज्यातील एकूण शेतकरी : सुमारे 1 कोटी 71 लाख शेतकरी ओळख क्रमांक काढलेले : 1 कोटी 31 लाख दुष्काळबाधित शेतकरी : 1 कोटी 10 लाख पहिल्या टप्प्यात 5 हजारांची मदत मिळालेले : सुमारे 1 कोटी अद्याप मदत न मिळालेले : सुमारे 10 लाख प्रस्तावित दुसरा हप्ता : 2 हजार रुपये हेही वाचा…. रोहित पवारांकडून VSR कंपनीच्या संपत्तीचा भांडाफोड:मफलर मॅन म्हणून दाखवला फडणवीसांचा फोटो, VSR च्या मालकाला पाठीशी घातल्याचा आरोप महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूला साडे नऊ महिने उलटून गेले तरी अद्याप चौकशी अहवाल समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सरकारवर आणि तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात होता की घातपात, यावरून संभ्रम कायम असून, त्यांनी याप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे; तसेच, अपघाताच्या दिवशी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो मफलरचा फोटो रोहित पवारांनी ट्विट केला होता, त्या व्यक्तीचे नाव देखील त्यांनी जाहीर केले आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *