Headlines

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात शिक्षणमंत्री करणार:संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले- फडणवीसांनी कुठे राहायचे हे मोदी-शहांच्या हातात




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीला शिक्षणमंत्री करण्यापेक्षा एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला त्या पदावर बसवले पाहिजे. हे पद उत्तमरीत्या सांभाळू शकणारे अनेक लोक देशात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाच केंद्रात शिक्षणमंत्री केले जाणार आहे, असा ठाम दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपमध्ये या पदासाठी त्यांचेच नाव चर्चेत आहे. फडणवीस यांना कुठे ठेवायचे हे त्यांच्या हातात नाही, नाहीतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले नसते. मोदी आणि शहा यांनी आदेश दिल्यानेच ‘कमिशनरचा हवालदार’ झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत म्हणाले की, नव्या शिक्षणमंत्र्यांचा शिक्षणाशी आणि व्यवस्थेशी किती संबंध आहे? असा सवाल करत राऊत यांनी नव्या विधेयकावरही टीका केली. पेपर फोडणाऱ्यांना आधी 1 वर्षाची शिक्षा आणि1 कोटी दंड होता, आता केवळ आकडे बदलून 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी दंड करण्यात आला आहे. हे सरकार स्वतः कायद्यांचे किती पालन करते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशात पक्षांतर बंदी कायदा असताना मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते आणि लोकसभा, विधानसभा, राज्यसभेचे अध्यक्ष या कायद्याचे खरोखर पालन करतात का? कायदा हा केवळ एक देखावा बनला आहे, अशी टीका त्यांनी केली. लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? संजय राऊत म्हणाले की, कायदा कुणी पाळत नाही हे स्पष्टच आहे, पण विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला. अश्रूधूर सोडणे, पोलिसांकडून मुलींचा विनयभंग होणे हे कोणाच्या सांगण्यावरून झाले, यावर संसदेत चर्चा होणार असल्याचे राऊत म्हणाले. देश बेकायदेशीरपणे चालवला जात असून, कोणत्या कायद्याच्या आधारावर देशाची सार्वजनिक संपत्ती अदानी यांच्या घशात घातली जात आहे? असेही ते म्हणाले. विद्यापीठांचे कुलगुरू आरएसएसने नेमले संजय राऊत म्हणाले की, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारने नव्हे तर आरएसएसने नेमले आहेत. अशा कुलगुरूंमुळे शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? भाजपच्या कोणत्या नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत आणि तिथे उद्योग करत आहेत, हे मोदी सरकारने आधी जाहीर करावे. सर्व मंत्र्यांची आणि नेत्यांची मुले परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत आणि गरिबांच्या मुलांना मात्र इथल्या बोगस शिक्षण पद्धतीत अडकवून ठेवले जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 10 वर्षांत शिक्षण पद्धतीचा बट्ट्याबोळ संजय राऊत म्हणाले की, पंडित नेहरूंच्या काळापासून देशातील शिक्षण पद्धती आधुनिक होती. मात्र, गेल्या 10 वर्षांत या व्यवस्थेचा पूर्ण बट्ट्याबोळ करण्यात आला आहे. आधुनिक शिक्षणाकडून देशाला जाणीवपूर्वक पुन्हा महाभारताच्या काळातील जुन्या शिक्षण पद्धतीत नेले जात आहे. याबद्दल सरकारने जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत, ‘काँग्रेसने देशात कॉलेज आणले आणि भाजपने गोशाळा’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *