Headlines

नगरपालिकांच्या विकासासाठी निधीची तरतूद करणार:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारीही घेणार, एकनाथ शिंदेंची घोषणा




राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. नागपूरमध्ये राज्यातील नगराध्यक्षांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छोट्या शहरांच्या विकासासाठी विविध विभागांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरपालिकांच्या हद्दीत मुलांसाठी खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाही मदतीचा हात देण्यात येणार असून, त्यांच्या मुलींच्या रखडलेल्या लग्नांची जबाबदारी घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. नगरपालिकांच्या विकासासाठी विविध माध्यमांतून निधी उपलब्ध करणार राज्यातील छोट्या शहरांच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. नगरपालिकांच्या हद्दीत आवश्यक असलेल्या विकासकामांना प्राधान्य देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. ही कामे विविध विभागांच्या निधीतून, उपलब्ध निधीच्या तरतुदीतून तसेच CSR आणि कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून करता येतील का, याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. या सर्व पर्यायांचा विचार करून नगरपालिकांमधील विकासकामांना गती देण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी केवळ राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अन्य पक्षांचे नगरसेवक यांना सोबत घेऊन शहराचा विकास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार नगरपालिकांच्या नगराध्यक्षांच्या कार्यक्षेत्रालगत ग्रामीण भागांचाही समावेश असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हेही आपलेच भाऊ-बहीण असल्याची भावना व्यक्त करत त्यांनाही शक्य ती मदत करण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने ठरलेली असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे ती रखडली आहेत. अशा कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेऊन त्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. खेळाच्या मैदानांसाठी 1 कोटींचा निधी मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने उपलब्ध व्हावीत, यासाठीही सरकारकडून पुढाकार घेण्यात आला आहे. मागील वर्षी नमो गार्डनसाठी ज्याप्रमाणे निधी देण्यात आला होता, त्याच धर्तीवर आता खेळाच्या मैदानांच्या विकासासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही नगरपालिका क्षेत्रांमध्ये मैदाने उपलब्ध नाहीत, तर काही ठिकाणी असलेल्या मैदानांचा विकास होणे आवश्यक आहे. मुलांना सराव करता यावा, विविध खेळ खेळता यावेत आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. गड-किल्ल्यांवर संविधान दिन साजरा करण्याचे आवाहन 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून गड-किल्ल्यांवर स्वच्छता आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या सुविधांवर काम सुरू करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील गड-किल्ल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन या ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छतेवर भर दिला जात आहे. तसेच संविधान दिनानिमित्त संबंधित भागातील नागरिकांनी गड-किल्ल्यांवर जाऊन संविधान दिन साजरा करावा, अशी संकल्पनाही मांडण्यात आली आहे. यामुळे देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित होईल, असे शिंदे म्हणाले. ‘आमदारांनी मीडियात कमी बोला, जास्त काम करा’ नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांनी कामावर अधिक भर देण्याचा सल्ला दिला. आमदारांनी मीडियामध्ये कमी बोलावे आणि जास्त काम करावे. लोकांचे म्हणणे अधिक ऐकून घ्यावे आणि प्रत्यक्ष कामातून उत्तर द्यावे, असे ते म्हणाले. नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून आलेले असल्याने संपूर्ण शहराप्रती त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर शिंदेंचे उत्तर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांबाबत विचारले असता, या सगळ्या मीडियातील चर्चा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्हीच या ऑपरेशनला नाव दिले आहे आणि तुम्हीच त्यावर चर्चा सुरू केली आहे. योग्य वेळी सर्व गोष्टी समजतील, असे सूचक उत्तर त्यांनी दिले. राहुल गांधींवर टीका; ‘भारताची बदनामी करणे योग्य नाही’ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेशातील वक्तव्यांवरही एकनाथ शिंदे यांनी टीका केली. राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे. परदेशात जाऊन भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत नकारात्मक वक्तव्य करणे आणि अर्थव्यवस्थेला ‘डेड इकॉनॉमी’ म्हणणे योग्य नाही, असे शिंदे म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि आर्थिक व्यवस्थापनाचे कौतुक केल्याचा दाखला देत शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. भारताचा GDP 7 टक्क्यांनी वाढत असल्याचा उल्लेख करत त्यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचे समर्थन केले. तसेच आशिया पॉवर इंडेक्सच्या सर्वेक्षणाचा उल्लेख करत भारताची अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा केला. ‘सत्ता बदलणे जनतेच्या हातात’ विरोधकांकडून रेजिम चेंजची भाषा केली जात असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सत्ता बदलणे हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या हातात नसून जनतेच्या हातात असते. जनतेने 2014 मध्ये सत्ताबदल केला आणि आता भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. देशातील 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *