![]()
एका क्लिकवर सातबारा अन् कागदमुक्त कारभाराचा गवगवा केला जात असला, तरी त्याच संगणकीकृत सातबाऱ्यामागे दडलेला जमिनींचा जुना हिशेब शोधण्यासाठी तलाठ्यांना आता धुळीने माखलेल्या लाल गाठोड्यात शोधाशोध करावी लागत आहे. भोगवटादार वर्ग-२ जमिनींच्या खरेदी-विक्रीत शासनाचा कोट्यवधींचा नजराणा बुडाला का, परवानगीशिवाय व्यवहार झाले का आणि जुन्या सातबाऱ्यावरील अटी-शर्ती संगणकीकरणात कुठे गायब झाल्या, याचा छडा लावण्यासाठी जिल्ह्यातील ४९० सज्जांशी संबंधित जुन्या अभिलेखांची झाडाझडती सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अल्टिमेटममुळे मुदतीत अहवाल देण्याचा दबाव असल्याने शनिवार-रविवारची सुट्टीही या शोधमोहिमेत जात आहे. टेबल-खुर्चीऐवजी रेकॉर्ड रूमची जमीन, संगणकाऐवजी जीर्ण पाने अन् समोर लाल गाठोड्यांचे ढीग, अशा स्थितीत तलाठी एकेक नोंद शोधत आहेत. जमिनीचा जुना इतिहास शोधणे म्हणजे केवळ संगणकावर नाव टाकून नोंद काढणे नाही. गाव, सर्व्हे क्रमांक, जुना सातबारा, फेरफार ते त्यामागील मूळ आदेशापर्यंत कागदांचा माग काढावा लागत आहे. वर्षानुवर्षे कपाटात बांधून ठेवलेली लाल गाठोडी उतरवून जीर्ण पाने चाळायची, आजच्या संगणकीकृत सातबाऱ्याशी तिचा मेळ घालायचा, अशी कसरत प्रशासनाला करावी लागत आहे. वर्ग-२ चा वर्ग-१ कसा झाला? दुवा रडारवर भोगवटादार वर्ग-२ जमीन हस्तांतरित करताना सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आणि नियमानुसार नजराणा आवश्यक असतो. त्यामुळे जुन्या अभिलेखात वर्ग-२ असलेली जमीन पुढे वर्ग-१ कशी झाली, त्यासाठी सक्षम आदेश होता का आणि शासनाचा नजराणा भरला गेला का, याचा माग काढला जात आहे. जुन्या फेरफारापासून सातबाऱ्यापर्यंतची साखळी जुळवली जात असल्याने अनेक वर्षांपूर्वीचे व्यवहारही तपासणीच्या कक्षेत आले आहेत. डिजिटल ऑडिटच्या मागणीस प्रतिसाद Ãशासकीय जमिनी हा राज्याचा ठेवा आहे. डिजिटल ऑडिटच्या मागणीस शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यामुळे नियमबाह्य जमिनी सरकारजमा होऊन महसुलात भर पडेल. – हर्षवर्धन जाधव, माजी आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने तपासणी Ãजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जुन्या महसुली अभिलेखांची तपासणी सुरू आहे. वर्ग-२ जमिनींच्या नोंदी व अटी-शर्तींची पडताळणी करून अहवाल तयार केला जात आहे. नियमित कामे प्रभावित होणार नाहीत याची दक्षता घेत आहोत. – सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर
Source link
‘नजराणा चोरी’चा शोध; जिल्हाभर जुन्या अभिलेखांची झडती:जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयांत 490 तलाठ्यांचे सुट्टीच्या दिवशीही रेकॉर्ड रूममध्ये ठाण