Headlines

नवीन मक्याला दोन हजारांचा भाव; 43 अंश तापमानातही काढणी सुरू:मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल‎




एकीकडे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून उष्माघाताच्या घटना समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ आणि परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर ४३ अंश सेल्सिअस तापमानातही जीवाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. सध्या परिसरात मका काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून कडक उन्हातही शेतकरी कुटुंबे शेतीकामात मग्न आहेत. दुपारच्या कडक उन्हात मका काढणी करताना शेतकरी आणि महिला मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत असताना, चेहऱ्यावर कापड बांधून व डोक्यावर ओढणी घेऊन महिला मजूर मक्याची मळणी यंत्राद्वारे काढणी करून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरण्याचे काम करताना दिसत आहेत. काही ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने मका वेगळी केली जात असली तरी त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासत आहे. रखरखत्या उन्हामुळे शेतात धुळीचे लोट उडत असून, उष्ण वाऱ्यामुळे काम करणे अधिकच कठीण होत आहे. आज काम नाही केले, तर उद्याचा संसार कसा चालणार? या एकाच प्रश्नामुळे शेतकरी व मजूर उन्हाची पर्वा न करता दिवसभर शेतात घाम गाळत आहेत. अनेक मजूर सकाळपासून संध्याकाळापर्यंत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. एकीकडे नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात असताना, शेतकऱ्यांसाठी मात्र उन्हापासून बचावाचा कोणताही पर्याय नसल्याचे भीषण वास्तव आहे. स्वतः उन्हात होरपळत संपूर्ण जगाच्या अन्नाची व्यवस्था करणाऱ्या या पोशिंद्याच्या श्रमाला शासनाने न्याय देण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जुन्या मक्याला १७०० रुपयांचा भाव ज्या उन्हात सामान्य माणूस घराबाहेर पडायलाही घाबरतो, त्या रखरखत्या उन्हात अंगातून घामाच्या धारा वाहत असताना आणि धुळीच्या ढगात दिवसभर राबूनही बाजारात शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. सध्या बाजारपेठेत जुन्या मक्याला प्रति क्विंटल फक्त १७०० रुपये तर नवीन मक्याला २००० रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. खते, बियाणे, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढलेला असताना मिळणारा हा दर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *