![]()
नवी मुंबईतील प्रस्तावित ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेवरून महायुती सरकारमधील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. क्लस्टर योजनेच्या नावाखाली अवघ्या ३० वर्षांच्या आतील सुस्थितीतील इमारती या योजनेत बळजबरीने समाविष्ट केल्या जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांनी केला आहे. या योजनेला कडाडून विरोध दर्शवताना, “माझ्या नादाला लागल्यास त्याला त्याची जागा नीट दाखवेन,” असा थेट आणि आक्रमक इशारा नाईक यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्र्यांचे नाव न घेता दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर स्पष्ट विरोध नोंदवल्याचा उल्लेख करत नाईक म्हणाले, “युनिफाइड डीसीआर नियम लागू करून नवी मुंबईचा एफएसआय अवाजवी वाढवला जात आहे. यामुळे शहराची मूळ रचना कोलमडून भविष्यात नवी मुंबईतील जीवन असह्य होईल. नाईक यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. नाईकांना कुणी विचारत नाही “नाईकांना पक्षात कुणी विचारत नाही आणि आता त्यांचे काही वजनही उरलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सख्य मजबूत असून नाईक यांच्या रोजच्या बडबडीकडे आम्ही लक्ष देत नाही,” असा पलटवार करत शिंदेसेनेच्या नेत्यांनी या वादात आणखी भर घातली आहे. दरम्यान, क्लस्टर योजना आणि यूडीसीपीआरवरून महायुतीतील दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये उघडपणे मतभेद समोर आल्याने आगामी काळात हा विषय आणखी गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Source link
नवी मुंबई क्लस्टर योजनेवरून सुरू झाला मोठा वाद:माझ्या नादाला लागल्यास जागा दाखवू, नाईकांचा शिंदेसेनेस इशारा