.

माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या बहुचर्चित अशा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत गेली महिनाभर बाधित समर्थक व विरोधक शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. त्यावर जवळपास दोन महिन्यांनी तालुक्यातील भाजप नेतृत्वाने समर्थनार्थ तर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी भूमिका जाहीरपणे स्पष्ट केली आहे. माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथे भाजपने तर पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार पक्ष) एकाच दिवशी आपली भूमिका स्पष्ट केली. साधारणपणे एप्रिलपासून या प्रस्तावित महामार्गाची व त्यासाठी लागणारी जमीन न देण्याची चर्चा चालू आहे. त्यानंतर दि. ३० एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी वेळापूर येथे तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दि. १२ मे रोजी निमगाव येथे सभा घेऊन आपण या महामार्गाचे विरोधातील शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. दि. १७ मे रोजी मोहिते-पाटील यांनी त्यांच्या शिवरत्न या निवासस्थानी बाधितांची बैठक घेऊन मते जाणून घेतली. मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
दि. २० मे रोजी भाजप कार्यकर्त्यांनी वेळापूर येथे शक्तिपीठ महामार्ग समर्थकांची बैठक घेतली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आपण या बधितांच्या बांधावर त्यांची मते जाणून घेणार असल्याचे जाहीर करत त्यानुसार त्यांनी दि. २१ मेपासून बाधित गावातील शेतकऱ्यांच्या भेटी सुरू केल्या. तसेच दि. २३ मे रोजी निमगाव येथील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे तर मांडलेच शिवाय आंदोलनाचा निर्वाणीचा इशाराही दिला. अकलूज येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात कायदेशीर हरकतीही नोंदवल्या. मात्र तोपर्यंत माळशिरस तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती.
लोकशाहीमार्गाने लढा देत राहू : खासदार मोहिते शेतकऱ्यांचा विरोध असताना हा शक्तिपीठ महामार्ग करणे अन्यायकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता होणार नाही. लोकशाही मार्गाने लढा देऊ, असे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.