![]()
राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करणारी आहेत. सध्या देश सामाजिक, राजकीय अस्थिरतेकडे प्रवास करताना दिसून येत असून देशातील युवक आज प्रचंड अस्वस्थेत आहे. सातत्याने वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कौशल्यांचा अभाव, शेतकऱ्यांच्या पीक मालाला कवडीमोल किंमत यामुळे देशातील सत्ताधारी आणि विरोधकांवर सुद्धा तरुण पिढी भडकल्याचे चित्र पाहायला मिळत असून राष्ट्रीय समाज पक्षाचा अजेंडा हा देशाला दिशादर्शक ठरवणारा असून, आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्षाचा मी पंतप्रधान होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढा तालुक्यातील टाकळी (टें) येथे पक्षनिधी संकलनावेळी व्यक्त केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हाती माढा तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ५८ हजार रुपयांची पक्षनिधी थैली सुपूर्द करण्यात आली. यावेळी पक्ष संघटन बांधणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब नगरे, माढा तालुका अध्यक्षपदी हनुमंत खांडेकर, युवक अध्यक्षपदी दत्ता काळे यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तानाजीराव शिंगाडे, सुग्रीव रुपनवर, विकास आलदर, युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंद पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. झारीतले शुक्राचार्य तुम्हाला काम करू देत नाहीत या वेळी जानकर म्हणाले, समाजासाठी कितीही चांगले काम करत असाल तरीही झारीतले शुक्राचार्य काम करू देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी आयएएस, आयपीएस झाले पाहिजे. शिक्षणच तुमची क्रांती घडवू शकते. केवळ धर्म, जातीचे राजकारण करून आर्थिक विषमता, मागासलेपण संपणार नसून सर्वसमावेशक राजकीय व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असून, यासाठी देशात युवकांना राष्ट्रीय समाज पक्ष संधी देणार असल्याचे सांगितले.
Source link
येणारी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार:टाकळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या निधी संकलनावेळी महादेव जानकर यांच्याकडून संकेत