![]()
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी मोहोळ येथील श्री नागनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. श्रावण सोमवारनिमित्त श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या
.
श्रावण महिन्यात श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने मोहोळ शहरासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाले होते. दिवसभर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. ‘ना चिंता ना भय’, ‘श्री नागनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील नारळ, अगरबत्ती, पेढे, हार, फुले, बेलपत्र, तेल आदी पूजा साहित्य विक्रेत्यांचीही मोठी लगबग सुरू होती. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी कायम राहिल्याने विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळी साडेआठच्या सुमारास श्री नागनाथ महाराजांच्या पालखी छबिन्याचे आयोजन करण्यात आले. अभंग गायन आणि भक्तिमय वातावरणात पालखी छबिना पार पडला. यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रसाद वाटपाने छबिन्याची सांगता झाली.
पालखी छबिन्याने भक्तिमय वातावरण