Headlines

नागपूर पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई:हॉटेल मालक अंमली पदार्थांचा किंगपिन, 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त




नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. उमरेड येथे दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करत पोलिसांनी थेट झारखंड राज्यात धाड टाकली. या कारवाईत टोळीचा म्होरक्या असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू आणि २३ लाख ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह एकूण १ कोटी ९२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत तब्बल २ कोटी २५ लाख ६८ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या आंतरराज्यीय रॅकेटच्या कारवाईची सुरुवात २० मे २०२६ रोजी झाली. नागपूर ग्रामीणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उमरेड ते नागपूर रोडवरील उदासा उड्डाणपुलाजवळ एका संशयास्पद ट्रकची तपासणी केली होती. या कारवाईत ट्रक चालकाच्या ताब्यातून १ लाख १८ हजार ५८५ रुपये किमतीचा २३७.१७० ग्रॅम अफू, मोबाईल आणि ट्रक असा एकूण ३३ लाख ३१ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी या तस्करीच्या मूळ पुरवठादाराचा शोध घेण्यासाठी एक विशेष तपास पथक तयार केले. या पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय तपास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर या अंमली पदार्थांचे मूळ कनेक्शन थेट झारखंड राज्यामध्ये असल्याचे शोधून काढले. त्यानंतर पोलिसांचे पथक तत्काळ झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील भंडारटोली, करपनादास भागात रवाना झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने २५ मे २०२६ रोजी सिमडेगा येथून मुख्य अंमली पदार्थ पुरवठादार मनीषकुमार अंबिकाप्रसाद (वय ४६ वर्षे, रा. भंडारटोली, झारखंड) या हॉटेल व्यावसायिकाला अटक केली. अटक केलेल्या आरोपीच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांनी तिथे तब्बल १ कोटी ६८ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा ३३ किलो ७६७ ग्रॅम अफूचा साठा आढळून आला. तसेच घरातून २३ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लास्टिक पिशव्या आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ९२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उमरेड पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३४ किलो ४ ग्रॅम १७० मिलीग्रॅम अफू जप्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *