![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भासाठी एक मोठी ‘गुड न्यूज’ दिली आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला विमानतळ विकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून, ‘जीएमआर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड’ (GNIAL) कडे ३० वर्षांसाठी या विमानतळाच्या संचालनाची धुरा सोपवण्यात येणार आहे. या प्रकल्पातील मुख्य अडथळा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) जमिनीच्या लीज मुदतीचा होता. केंद्र सरकारने आता ही लीज मुदत ६ ऑगस्ट २०३९ नंतरही वाढवण्यास संमती दिली आहे. २००९ मध्ये ‘मिहान इंडिया लिमिटेड’ची (MIL) स्थापना झाल्यापासून जमीन सीमांकन आणि निविदा प्रक्रियेवरून अनेक कायदेशीर लढाया झाल्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘मिहान’ आणि ‘जीएमआर’ यांच्यात करार झाला होता, ज्याला आता केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. विमानतळ होणार ‘जागतिक दर्जाचे’ या प्रकल्पामुळे नागपूर विमानतळाची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. भविष्यात दरवर्षी ३ कोटी प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता या विमानतळाची असेल. केवळ प्रवासी वाहतूकच नाही, तर ‘मिहान’ (MIHAN) प्रकल्पांतर्गत नागपूरला एक मोठे प्रादेशिक विमानवाहतूक केंद्र आणि आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणून विकसित केले जाणार आहे. विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला भरारी केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विदर्भ क्षेत्रात मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. आधुनिक टर्मिनल, धावपट्ट्यांचे विस्तारीकरण आणि जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधांमुळे कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. खासगी क्षेत्रातील कार्यक्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागपूर विमानतळाला आशियातील महत्त्वाच्या विमानतळांच्या यादीत स्थान मिळवून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. नागपूर विमानतळाबाबत फडणवीस काय म्हणाले? “मला अतिशय आनंद आहे की, नागपूर विमानतळ म्हणून एक ब्राऊनफिल्ड एअरपोर्ट नव्याने डेव्हलोप करण्याकरता मागच्या काळात महाराष्ट्र सरकारने टेंडर दिले होते. त्यानंतर त्याची हँडिंग ओव्हर आणि बऱ्याच प्रक्रियांकरता मंत्रिमंडळाची परवानगी हवी होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. त्यामुळे नागपूरला अतिशय सुंदर ब्राउनफिल्ड एअरपोर्ट तयार करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो”, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
Source link
नागपूर विमानतळाचा कायापालट होणार:केंद्र सरकारकडून 'जीएमआर'ला हिरवा कंदील; 30 वर्षांसाठी खासगीकरणाला मंजुरी