![]()
पुणे पोलिसांनी व्हॅलेंटिना मेगाकॉर्प एलएलपी आणि तिच्याशी संबंधित संस्थांच्या बँक खात्यांवर अंतरिम जप्तीची कारवाई केली आहे. गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून अनियंत्रित ठेवी स्वीकारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ च्या तरतुदींनुसार याबाबत आदेश काढले आहेत. यामुळे संबंधित खात्यांतील रक्कम काढणे, हस्तांतरित करणे किंवा अन्य आर्थिक व्यवहार करण्यावर निर्बंध आले आहेत. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, व्हॅलेंटिना मेगाकॉर्प एलएलपी, तिच्याशी संलग्न इतर एलएलपी आणि कंपनीच्या भागीदारांनी गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन ठेवी स्वीकारल्या. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ च्या कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, संबंधित संस्थांचा ठेवी स्वीकारण्याव्यतिरिक्त कोणताही फायदेशीर व्यवसाय नव्हता. नवीन गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारून त्यातून जुन्या गुंतवणूकदारांना परतावा दिला जात असल्याचेही निदर्शनास आले. यामुळे भविष्यात सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची संस्थांची आर्थिक क्षमता नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अनियंत्रित ठेवींच्या माध्यमातून संबंधित संस्था, व्यक्ती किंवा अन्य एलएलपींच्या नावावर रक्कम किंवा मालमत्ता संपादित करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अशा रकमा आणि मालमत्तेवर अंतरिम जप्ती आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई अधिनियमातील कलम ७(३) नुसार करण्यात आली आहे. गृह विभागाच्या १४ जानेवारी २०२१ रोजीच्या अधिसूचनेद्वारे पोलिस आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जप्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.
Source link
व्हॅलेंटिना मेगाकॉर्पच्या बँक खात्यांवर अंतरिम जप्ती:भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारल्याप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई