![]()
महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला असून, मराठा आणि ओबीसी समाज थेट मुंबईतील आझाद मैदानावर आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गटांनी एकाच वेळी मुंबईत आंदोलनाची हाक दिली असून, आझाद मैदानावर आधी कोण धडकणार आणि कुणाला परवानगी मिळणार, यावरून मोठा प्रशासकीय पेच उभा राहिला आहे. ओबीसी आंदोलकांचा पहिला दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत पुन्हा एकदा मोठे आंदोलन पुकारले आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेपूर्वीच ओबीसी समाजाने आझाद मैदानावर २८ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यासाठी पोलिसांत अर्ज दाखल केला आहे. ओबीसी नेते आणि वकील मंगेश ससाणे यांनी १२ ऑगस्ट रोजीच आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी परवानगी मागितली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या नियमानुसार, सर्वात आधी अर्ज केल्यामुळे आमच्याच आंदोलनाला परवानगी मिळायला हवी, अशी ठाम भूमिका ससाणे यांनी घेतली आहे. “वरातीमागून घोडे चालणार नाही” या परवानगीच्या मुद्द्यावरून मंगेश ससाणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ससाणे म्हणाले की, “आम्ही वेळेआधीच आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मनोज जरांगेंचे ‘वरातीमागून घोडे’ इथे चालणार नाही. प्रशासनाने अर्जाचा दिनांक आणि नोंदणीचा क्रम तपासूनच योग्य तो निर्णय घ्यावा.” तसेच, हे आंदोलन ओबीसी, व्हीजेएनटी, अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या हक्कांसाठी असून, लवकरच कार्यकर्त्यांच्या बैठकीत या आंदोलनाची अधिकृत घोषणा आणि पुढील रणनीती ठरवली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पोलिसांची डोकेदुखी वाढली एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ‘ओबीसी’तून कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत आणि पुन्हा एकदा मुंबईत धडक मारण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे, आपले आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघटनांनी आधीच मैदानात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे. दोन्ही गटांनी एकाच मैदानासाठी आणि सलगच्या तारखांसाठी परवानगी मागितल्याने आझाद मैदान पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात आझाद मैदान पोलीस प्रशासन कोणाला परवानगी देणार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. हेही वाचा.. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी वर्षाला 25 लाखांचा प्रस्ताव: पालिकेच्या खर्चावरून चर्चा, मनसेकडून खर्चावर आक्षेप मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापन आणि प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 19 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षासाठी 25 लाख 12 हजार 786 रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे. सविस्तर वाचा
Source link
आझाद मैदानासाठी मराठा-ओबीसी आमनेसामने:दोन्ही गटांचे अर्ज, पोलिसांकडून कोणाला मिळणार परवानगी? आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत आंदोलनांची तयारी