![]()
भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा नवा ट्रेंड यंदाच्या रक्षाबंधनात दिसून येत आहे. अहिल्यानगरच्या बाजारपेठेत ‘सीड राखी’ अर्थात बियाणे असलेल्या पर्यावरणपूरक राख्यांना तरुणाईकडून पसंती मिळत आहे. राखीचा सण संपल्यानंतरही तिच्या माध्यमातून रोपटे उगवावे, हा सामाजिक संदेश या राख्यांतून दिला जात आहे. येत्या २८ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने शहरातील माळीवाडा, कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी व सावेडी परिसरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या राख्यांनी सजल्या आहेत. पारंपरिक रेशमी धाग्यांपासून नक्षीदार, कस्टमाईझ, चंदनाच्या राख्यांपर्यंत शेकडो प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, यंदाचे वेगळेपण ठरत आहे ते सीड राख्यांचे. या राख्यांमध्ये विविध वनस्पतींची बियाणे वापरली जात असून, राखी काढल्यानंतर ती मातीत लावता येते. त्यातून रोपटे उगवण्याची संकल्पना असल्याने पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी अनेक जण या राख्यांची निवड करत आहेत. लहान मुलांसाठी छोटा भीम, डोरेमोन, लाईट-म्युझिक आणि फुग्यांच्या राख्या ५० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर तरुणाईकडून नावाच्या कस्टमाईझ राख्या, चंदनाच्या राख्या आणि सीड राख्यांना मागणी आहे. माळीवाडा व कापड बाजारात सायंकाळच्या वेळी राखी खरेदीसाठी गर्दी होत आहे. साध्या राख्या १० रुपयांपासून, तर फॅन्सी राख्या ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. दरवाढीनंतरही सणाच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. परगावी व परदेशात राहणाऱ्या भावांना वेळेत राखी पोहोचवण्यासाठी पोस्ट ऑफिस तसेच स्थानिक कुरिअर केंद्रांवरही महिलांची लगबग सुरू आहे. चिमुकल्यांसाठी ‘कार्टून’ राख्या लहान मुलांसाठी बाजारात यंदा विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे. लांब रेशमी धाग्यांच्या पारंपरिक राख्या, फॅन्सी व कुंदन, मणी राख्या, छोटा भीम, स्पायडरमॅन, लाईट-साऊंड आणि सिलिकॉन राख्यांना प्रचंड मागणी आहे. पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मातीत पुरल्यानंतर रोप उगवणाऱ्या ‘सीड राख्या’, बांबू आणि खादीच्या हस्तनिर्मित राख्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक महिला बचत गटांनी तयार केलेल्या या राख्या ३० ते १०० रुपयांना उपलब्ध आहेत.
Source link
बहिणींची नवी ‘ग्रीन’ बांधिलकी; " सीड' राख्यांना पसंती:विविध प्रकारच्या राख्या खरेदीची माळीवाडा, कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी चौकात लगबग