![]()
श्रीरामपूर अखंड हरिनाम सप्ताह हा तपस्या यज्ञच आहे. १० ते १२ हजार टाळकरींचे १६८ तास अखंड भजन पाहिल्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी आवतरल्याशिवाय रहाणार नाही. फक्त भक्ती करताना ती निस्वार्थ अंतकरणाने केली पाहिजे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. सद्गुरुंच्या कृपेने सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊदे अशी प्रार्थना याप्रसंगी त्यांनी केली. वारकऱ्यांचा कुंभमेळा संबोधला जाणारा १७९ वा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी धनगरवाडी या ठिकाणाहून सकाळी १० वाजता अश्वरथातून सराला बेटाचे अधिपती महंत रामगिरी महाराज यांची श्रीरामपूरपासून ते धनगरवाडीपर्यंत तरूणांनी चार हजार मोटरसायाकल रॅली तसेच ढोलताशा, लेझीम व झांज पथकाच्या गजरात सनई चौघड्याच्या निनादात सप्ताहस्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी रस्त्यावर जागोजागी ऐतिहासिक देखावे, धनगरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे रामायणातील देखावे हे भाविकांचे आकर्षण होते. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समाज प्रबोधनात्मक देखावे व पथनाट्यांचे सादरीकरण भक्त मंडळाच्या नियोजनातून करण्यात आले. मिरवणूक मार्गावर धनगरवाडी शिवारात रिंगण सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते अखंड यज्ञ प्रज्वलित करून सद्गुरु गंगागिरी महाराज, ब्रम्हलीन नारायणगिरी महाराजांसह सर्व संताच्या प्रतिमाचे पुजन, विणापुजन करुन पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, पहिल्याच दिवशी मांडे व पुरणपोळीचा महाप्रसाद देण्यात आला. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्रीरामपूर, कोपरगाव, येवला, नांदगाव, वैजापूर, गंगापूर व सप्ताह पंचक्रोशीतील गावांनी मांडे व पुरणपोळी आणि निर्जंतुक केलेल्या हजारो लिटर दुधाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. पहिल्याच दिवशी २ ते ३ लाख भाविकांची उपस्थिती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. चार हजार भाविकांची मोटरसायकल रॅली सह भव्य मिरवणूक सांगता दिवशी ४५० क्विंटल बुंदी एकादशीच्या दिवशी २५० क्विंटल साबुदाणा खिचडी, तर सांगतेच्या दिवशी ४५० क्विंटल बुंदी आणि ७०० क्विंटल चिवडा महाप्रसादासाठी तयार ठेवण्यात येणार आहे. दररोजच्या भोजनव्यवस्थेसाठी चार ते पाच हजार स्वयंसेवक सेवेत राहणार असल्याची माहिती यावेली देण्यात आली.
Source link
निस्वार्थ अंत:करणाने प्रत्येकाने भगवंताची भक्ती करावी:महंत रामगिरी महाराज यांचे प्रतिपादन, सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ