![]()
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिली असून पावसाचा जोर सध्या कमकुवत झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश आणि बिहारकडे सरकल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. असे असले तरी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील ४ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कुठे आहे ‘यलो अलर्ट’? हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन येथे मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमधील पावसाचा अंदाज: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. २१ ऑगस्टचा अंदाज: उद्या (२१ ऑगस्ट) परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात कोणत्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही. उर्वरित महाराष्ट्र: राज्याच्या इतर भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. तिथे ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील आणि काही ठिकाणी तुरळक सरी पडतील. राज्यातील पावसाची सद्यस्थिती आणि आकडेवारी राज्यात पावसाने दडी मारल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप सरासरीइतका पाऊस झालेला नाही: मराठवाड्यात परभणी (२२% कमी), नांदेड (२०% कमी), लातूर (२३% कमी) आणि धाराशिवमध्ये (२०% कमी) पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातही अकोला, अमरावती (३१% कमी), नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली (२३% कमी) येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. कुठे झाला चांगला पाऊस? पुणे, नाशिक आणि पालघर जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ४२ ते ७० टक्के अधिक पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही सरासरीपेक्षा किंचित अधिक पाऊस झाला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगावसह इतर काही जिल्ह्यांत पाऊस सरासरीच्या आसपास आहे. धरणांची स्थिती चिंताजनक नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्व भागातील धरणांमध्ये अजूनही अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अक्कलकुवा-वडफळे परिसरातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे, तिथे नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा पाण्याच्या ठिकाणी थांबणे टाळावे. तसेच शेतातील कामे करताना आणि प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हेही वाचा… वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या वसमत तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. 13 वर्षांच्या एका भोळसर अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत, तिला केवळ 50 रुपये आणि बिस्किटाचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
राज्यात पावसाचा 'ब्रेक' कायम:मराठवाड्यात पावसाची मोठी तूट; पण 4 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, विजांसह वादळी सरींचा अंदाज