Headlines

मुलींचा हात धराल तर मार खाल!:विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमधील राड्यानंतर अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा




विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर सदस्य नोंदणी मोहिमेवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या घटनेवरून अभाविपला थेट इशारा दिला आहे. “तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणारच. आमच्या नादाला लागू नका,” असा आक्रमक इशारा अमित ठाकरे यांनी दिला. मुंबईत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमित ठाकरे यांनी साठ्ये महाविद्यालयातील घटनेवर मनसेची भूमिका स्पष्ट केली. अभाविपचे कार्यकर्ते विद्यार्थिनींचा हात धरून त्यांना सदस्यत्वासाठी घेऊन जात असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणला जात असेल तर मनविसे त्याचा विरोध करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सदस्य नोंदणीवरून सुरू झाला वाद साठ्ये महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अभाविपकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू होते. दोन्ही संघटनांचे स्टॉल जवळपास असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या संघटनेचे सदस्य करण्यावरून वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले आणि काही काळ महाविद्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून मनविसेकडून मुंबईतील विविध महाविद्यालयांबाहेर सदस्य नोंदणी मोहीम राबवली जात आहे. साठ्ये महाविद्यालयाबाहेरही मनविसेने स्टॉल लावला होता. त्याच ठिकाणी अभाविपनेही सदस्य नोंदणी सुरू केल्याने वादाला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. अभाविपचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना बळजबरीने आपल्याकडे घेऊन जात असल्याचा आरोप मनविसेकडून करण्यात आला. विशेषतः काही विद्यार्थिनींचे हात धरून त्यांना नेण्यात आल्याचा दावा मनसेने केला आहे. मुलींचा हात धराल तर आम्ही मारणारच या आरोपांवर बोलताना अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “अभाविपचे कार्यकर्ते मुलींना हात धरून घेऊन चालले होते. तुम्ही मुलींचा हात धराल तर आम्ही तुम्हाला मारणारच,” असे ते म्हणाले. “तुमची भाजपची संघटना आहे. भाजप सत्तेत आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगली कामे करता येतील, ती करा. मात्र विद्यार्थ्यांना जबरदस्तीने सदस्य बनवण्याची गरज काय?” असा सवालही अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे अभाविपला इशारा देताना, “आमच्या नादाला लागू नका. जिकडे जिकडे तुम्ही राडा करणार, तिकडे मार खाणार. तुम्हाला काम करायचे असेल तर नीट करा, आम्ही मध्ये येणार नाही,” असे म्हटले. विद्यार्थ्यांना खेचून नेऊ नका विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणी करताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली. “तुम्ही काम करा, आम्हाला काही अडचण नाही. पण कोणत्याही विद्यार्थ्याला खेचून घेऊन जाऊ नका. तुम्ही जबरदस्तीने कोणाला सभासद करत असाल तर आम्ही मध्ये पडणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अनेक मूलभूत समस्या प्रलंबित असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कॅन्टीन, स्वच्छतागृह आणि इतर विद्यार्थी सुविधांबाबत काम करण्याची गरज असताना केवळ सदस्य नोंदणीवर भर का दिला जात आहे, असा सवाल त्यांनी केला. “आम्ही एलफिन्स्टन आणि चेतना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या आहेत,” असा दावाही अमित ठाकरे यांनी केला. अभाविपला विद्यार्थ्यांमध्ये किंमत उरलेली नाही अमित ठाकरे यांनी अभाविपच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मनविसेने महाविद्यालयाबाहेर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले की अभाविपकडून त्याच ठिकाणी स्टॉल लावण्याचा प्रयत्न केला जातो. “मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू आहेत. अभाविपला कोणीही विद्यार्थी विचारत नाहीत. त्यामुळे आम्ही सदस्य नोंदणी अभियान सुरू केले की ते बाजूला स्टॉल लावतात,” असा आरोप त्यांनी केला. महाविद्यालयाच्या गेटवर किंवा परिसरात स्टॉल लावण्यासंदर्भात नियम असल्याचे सांगत त्यांनी, मनविसेने बाहेर स्टॉल लावला असतानाही अभाविपने गेटवर स्टॉल लावल्याचा आरोप केला. नेमका वाद कशावरून झाला? उपलब्ध माहितीनुसार, साठ्ये महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही संघटनांचे सदस्य नोंदणी अभियान सुरू होते. विद्यार्थ्यांना आपल्या संघटनेचे सदस्य करून घेण्यावरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मनविसेकडून विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना, जबरदस्तीने नेले जात असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, अभाविपने मात्र या घटनेचे वेगळे चित्र मांडले आहे. मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार यांनी दोन विद्यार्थिनींमध्ये झालेल्या गैरसमजामुळे काहीसा वाद निर्माण झाला होता, असे सांगितले. हा विषय आता पूर्णपणे संपला असून त्याचा संघटनात्मक किंवा वैयक्तिक वाद म्हणून अर्थ काढू नये, असे अभाविपने स्पष्ट केले. मनसेसोबत कोणताही संघटनात्मक वाद नाही अभाविपने मनसेसोबत कोणताही वैयक्तिक किंवा संघटनात्मक संघर्ष नसल्याचे स्पष्ट केले आहे. “ते त्यांचे सदस्यता अभियान करत आहेत आणि आम्ही आमचे सदस्यता अभियान करत आहोत. कोणत्याही संघटनेने विद्यार्थीहितासाठी काम केले तर आम्ही त्याचे स्वागतच करतो,” अशी भूमिका अभाविपकडून मांडण्यात आली. अभाविपच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील २५ हून अधिक महाविद्यालयीन परिसरांमध्ये आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. आगामी काळात मुंबईतील १०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये सदस्यता अभियान राबवण्याचा संघटनेचा मानस आहे. हे अभियान केवळ सदस्यसंख्या वाढवण्यासाठी नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, विद्यार्थीहिताचे प्रश्न आणि विविध विषयांवर वर्षभर विधायक चळवळ उभी करण्याचा उद्देश असल्याचेही अभाविपने सांगितले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली सदस्य नोंदणीवरून दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. या घटनेमुळे साठ्ये महाविद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. विद्यार्थी संघटनांमधील संघर्षाला राजकीय रंग सदस्य नोंदणीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या वादाला आता मनसे आणि भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटनेतील संघर्षाचे स्वरूप आले आहे. अमित ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि अभाविपने दिलेले स्पष्टीकरण यामुळे आगामी काळात मुंबईतील महाविद्यालयांमधील सदस्य नोंदणी मोहिमांवरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणीच्या स्पर्धेपेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणे महत्त्वाचे असल्याचे दोन्ही संघटनांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काळात महाविद्यालयीन परिसरातील सदस्य नोंदणी अभियान शांततेत पार पडते की पुन्हा संघर्षाची ठिणगी पडते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… राज्यात पावसाचा ‘ब्रेक’ कायम:मराठवाड्यात पावसाची मोठी तूट; पण 4 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, विजांसह वादळी सरींचा अंदाज राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिली असून पावसाचा जोर सध्या कमकुवत झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश आणि बिहारकडे सरकल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. असे असले तरी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील ४ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *