Headlines

नामदेव ढसाळांच्या भूमिकेत ललित प्रभाकर:इल्लैयाराजांचे असणार संगीत; 'ढसाळ' मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित




मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता ललित प्रभाकर नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आणि नाविन्यपूर्ण विषयांच्या निवडीमुळे प्रेक्षकांची मने जिंकत असतो. आता ललित एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. दलित पँथरचे संस्थापक आणि प्रख्यात विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटात ललित प्रभाकर मुख्य भूमिका साकारणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, यामध्ये ललितचा नामदेव ढसाळ यांच्या रूपातील अतिशय प्रभावी आणि करारी लूक पाहायला मिळतोय. हा बहुप्रतिक्षित चरित्रपट येत्या 1 ऑक्टोबर 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे ‘ढसाळ’ हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे, ज्यामुळे नामदेव ढसाळ यांचा क्रांतिकारी जीवनप्रवास राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल. चित्रपटाची घोषणा आणि ललित प्रभाकरचा नवा अवतार यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, एका महान कवीचा आणि लढवय्या नेतृत्वाचा प्रवास पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. वरुणा राणांचे दिग्दर्शन, तर इल्लैयाराजांचे असणार संगीत संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत व वरुणा मदनलाल राणा यांची निर्मिती असलेल्या या चरित्रपटातून दलित पँथर चळवळीचे प्रणेते आणि विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा ज्वलंत व संघर्षमय जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा वरुणा राणा यांनी सांभाळली असून, चित्रपटाला जागतिक कीर्तीचे संगीतकार इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. विशेष म्हणजे, हिंदीतील दिग्गज गीतकार इर्शाद कामील आणि मराठीतील प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली असून, या मातब्बर तंत्रज्ञांच्या संगमामुळे नामदेव ढसाळ यांचा हा जीवनप्रवास अधिक प्रभावी आणि कलात्मक होण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावर ललित प्रभाकरने चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले आहे. त्यासोबत त्याने खाली कॅप्शन लिहिले की, सर्वसामान्य माणसाला सत्तासंपत्तिप्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवणाऱ्या शोषणव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या तमाम छोट्या मोठ्या चळवळींना, प्रवृत्तींना अर्पण- पद्मश्री नामदेव ढसाळ, असे त्याने लिहिले आहे. त्याच्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत त्याच्या नव्या लुकचे कौतुक करत या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *