![]()
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला भगदाड पाडणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात होणाऱ्या अवैध खासगी वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘विशेष अंमलबजावणी मोहीम’ राबवण्याचे आदेश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून नियम मोडणाऱ्या वाहनांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशी असेल ‘ॲक्शन प्लॅन’ यंत्रणा या मोहिमेच्या यशस्वितेसाठी एसटी महामंडळाने विशेष संयुक्त पथके तैनात केली आहेत. यात खालील अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असेल. विभागीय वाहतूक अधिकारी आणि प्रादेशिक व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक, वाहतूक व सहायक वाहतूक निरीक्षक, सुरक्षा आणि दक्षता विभागाचे अधिकारी व पर्यवेक्षक, या सर्व पथकांना केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून नियमित तपासण्या करण्याचे आणि केलेल्या कारवाईचा सविस्तर ‘अनुपालन अहवाल’ थेट मुख्यालयाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बसस्थानकात अवैध वाहतूक सहन केली जाणार नाही एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. “एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीच्या उत्पन्नावर डल्ला मारणारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा खेळखंडोबा करणारी अवैध वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. बसस्थानक परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कडक कारवाई होणार आहे. -प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य अवैध व खासगी गाड्यांमुळे बसस्थानक परिसरात होणारी गुन्हेगारी, महिला प्रवाशांची छेडछाड आणि एजंटांची दादागिरी मोडून काढणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि दर्जेदार सेवा देणे हेच महामंडळाचे ध्येय आहे.
Source link
नियम मोडल्यास कारवाई:राज्यात एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहनांना नो एन्ट्री, 5 ते 15 जूनदरम्यान राज्यव्यापी मोहीम