Headlines

निरोगी वृद्धत्वासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस:सारडा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग, रासेयो, एनसीसीचा उपक्रम‎




आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये योगसाधनेस विशेष महत्त्व आहे. भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये “योग” संकल्पनेची मांडणी केलेली आहे. भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची महती वर्णन केली आहे. म्हणूनच दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून विविध संकल्पनांतून साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे देशात यंदाही बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या विशेष संकल्पनेतून साजरा करण्यात आला. या अनुषंगाने श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी येथे राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २१ रोजी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शारीरिक शिक्षण विभागाचे विभागप्रमुख डॉ. समीर बिजवे, योग प्रशिक्षक अभिषेक धर्मे व साहिल शहा यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानुसार उपस्थितांनी योगासने केली. कार्यक्रमादरम्यान प्राणायाम, ताडासन, भ्रामरी, वृक्षासन, वज्रासन, मकरासन, पवनमुक्तासन, शवासन व इतर योगासने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. महेंद्र गिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात यावर्षीच्या योग दिनाच्या “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेविषयी सखोल माहिती दिली. योग ही भारताने जगाला दिलेली संकल्पना आहे. असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमादरम्यान प्रा. डॉ. कविता मालोकार, डॉ. नितीन सराफ, डॉ. इंदल जाधव, डॉ. केशव माकोडे व डॉ. सत्येंद्र गडपायले आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समीर बिजवे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. नितीन घोडीले यांनी केले. कार्यक्रमादरम्यान रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. ममता येवतकर, डॉ. अनिकेत भुयार, डॉ. नविता मालाणी व एन.सी.सी. अधिकारी प्रा. श्री. अनिल ताडे यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी डॉ. राजेंद्र मानकर, डॉ. सतिश मार्डीकर, प्रशांत नांदुरकर, पूजा सारडा आदींचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रासेयो स्वयंसेवक तसेच एन.सी.सी. कॅडेट्स यश नेमाडे, कौतिक इंगळे, वैभव वरखडे, ओम किनकर व चैतन्य इंगळे आदींचे सहकार्य लाभले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *