![]()
नीट पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भुमिका घेत शुक्रवारी १५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून उग्र निदर्शने व घोषणाबाजी केली. शिक्षण क्षेत्रात फोफावलेले बाजारीकरण व भ्रष्टाचाराचाही यावेळी निषेध करण्यात आला. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. वैद्यकीय शिक्षणासह वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे नुकसान होत असून यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. दोन वर्ष परिश्रमपूर्व तयार करून परीक्षा दिल्यानंतरही पेपर फुटल्याने नीटचा पेपर रद्द करून आता पुन्हा नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखेपर्यंत पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. नीट पेपर फुटल्याच्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरासह राज्यात व अमरावती शहरातही उमटले आहेत. एनटीएने ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेली नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून फेर परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. १८० पैकी सुमारे १४० प्रश्न काही विद्यार्थ्यांना आधीच माहित असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींविरोधात कारवाई सुरू झाली असली अन् त्यांना जी शिक्षा व्हायची असेल ती होईलच. तरी या एकूण प्रकारामुळे मनापासून तसेच परिश्रमपूर्वक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उगाच मन:स्ताप सहन करावा लागत असून त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्याही अभ्यासातच जात आहेत. त्यामुळे तेही वैतागले आहेत. नीट पेपर फूटी प्रकरणातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून न्यायपूर्ण वातावरणातच परीक्षा कशी घेतल्या जाईल यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे, असे मत युवक काँग्रेसचे पदाधिकारी राहुल येवले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. तसेच सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा होत असून ही लाजिरवाणी बाब आहे. अशा प्रकारे वारंवार होत असलेल्या पेपरफुटी प्रकरणामुळे सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे ही ते पुढे म्हणाले. वाढलेल्या उन्हामुळे ऐरवी सकाळी होत असलेले आंदोलन तुम्ही सायंकाळी केले का? असा प्रश्न ज्यावेळी माध्यमांद्वारे विचारला गेला त्यावेळी हसून ते म्हणाले की आमचे पदाधिकारी ग्रामीण तालुक्याच्या ठिकाणावरून येत असल्यामुळे आम्ही सायंकाळची वेळ निवडली. अशा प्रकारांवर आळा घालणे आवश्यक खासगी शिकवणी वर्गांवर सध्या कोणाचाही अंकुश राहिला नसून विद्यार्थी दहावी झाली की, नीट, जेईईची तयारी सुरू करतात. आयआयटीयन तसेच डॉक्टर होण्याच्या शर्यतीत सातत्याने पेपर फुटणे, विद्यार्थ्यांना आधीच परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार याची माहिती देणे, पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क वसुल करणे या प्रकाराला आता आळा घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सर्वत्र शिक्षणाचा बाजार फोफावला असून गरीब हुशार विद्यार्थ्यांनी काय करायचे, असा प्रश्नही या निमित्ताने साहजिकच निर्माण झाला असून त्यांच्यासाठीच आम्ही आवाज उचलत असल्याचे युवक काँग्रेसने स्पष्ट केले.
Source link
‘नीट’ पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेसची निदर्शने, घोषणाबाजी:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे पोस्टर जाळले