Headlines

नेपाळमध्ये महापूर:ठाणे जिल्ह्यातील कैलास मानसरोवर यात्रेकरू संपर्काबाहेर, 31 जण अडकले असण्याची भीती, नातेवाईक चिंतेत




नेपाळ-चीन सीमेवरील रसुवा आणि भोटेकोशी परिसरात ढगफुटीनंतर आलेल्या भीषण महापुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक भाविकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. ठाणे शहर, नौपाडा, समता नगर, बाळकुम, कल्याण पश्चिम, डोंबिवली तसेच नवी मुंबईतील वाशी परिसरातील काही नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. महापुरानंतर मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्याने त्यांचा नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७ ते ८.३० वाजेपर्यंत काही यात्रेकरूंचा तिमुरे इमिग्रेशन सेंटर तसेच नेपाळ-चीन सीमेवरून कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर सीमेवरील परिस्थिती बिघडल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांकडून प्रशासनाकडे माहिती घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. नेपाळ पर्यटन बोर्डाच्या प्राथमिक माहितीनुसार, ३१ यात्रेकरू बेपत्ता किंवा अनपेक्षित ठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक ट्रॅव्हल एजन्सी तसेच काठमांडू येथील भारतीय दूतावासाच्या मदतीने यात्रेकरूंचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनही अलर्टवर नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनानेही आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत माहिती देऊ शकतात. यासाठी संबंधितांनी यात्रेकरूचे संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक, सध्याचे किंवा शेवटचे ज्ञात ठिकाण आणि टूरची माहिती देऊन ठाणे जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. नौपाडा, ठाणे येथील समीर मुकुंद जोशी व अपर्णा समीर जोशी, समता नगरमधील सतीश विनायक पाटणकर व रेखा सतीश पाटणकर, बाळकुममधील रजनीश रघुनाथ नातू, कल्याण पश्चिम येथील संजय राजमल पाटील व नलिनी संजय पाटील, डोंबिवलीतील सुनील सुदर्शन सुभेदार तसेच वाशी येथील यशस भंड यांचा या यात्रेकरूंमध्ये समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. कुटुंबीयांनी प्रशासनाशी संपर्क साधावा महापुरामुळे सीमेवरील संपर्कव्यवस्था विस्कळीत झाल्याने यात्रेकरूंशी थेट संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राचे टोल फ्री क्रमांक १०७७, तसेच ९३७२३ ३८८२७ आणि ०२२-२५३०१७४० या क्रमांकांवर माहिती देता येणार आहे. महाबळेश्वरमधील 10 महिला पर्यकही नेपाळमध्ये अडकल्या, सुखरुप असल्य्याची माहिती हेही वाचा.. नेपाळमध्ये अडकलेले विदर्भातील 110 पर्यटक सुरक्षित: प्रशासनाकडून परतीची व्यवस्था, 29 ऑगस्टला नागपुरात पोहोचणार नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पर्यटन आणि धार्मिक भेटीसाठी काठमांडू येथे गेलेल्या नागपूर जिल्ह्यातील ‘श्री. स्वामी महाराज’ यांच्या समूहातील सुमारे ११० नागरिक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. हे सर्व नागरिक आता मायदेशी परतत असून, प्रशासनाकडून त्यांच्या परतीसाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *