![]()
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या विभागस्तरीय अध्यक्ष व सचिवांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सह आयुक्त मंजुषा मिसकर तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत निवडणूक कार्यक्रम, मतदान प्रक्रिया, मतदार यादी, आदर्श आचारसंहितेचे पालन, उमेदवारी अर्ज आणि प्रशासकीय तयारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. जी. श्रीकांत म्हणाले, आचारसंहितेच्या कालावधीत सभा व इतर कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानग्या देताना प्रशासन व राजकीय पक्षांमध्ये योग्य समन्वय ठेवावा. उमेदवार व राजकीय पक्षांची गैरसोय होऊ नये, यासाठी एक खिडकी पद्धतीने परवानगी प्रक्रिया राबवावी. मतदारांची नावे चुकीच्या ठिकाणी नोंदवली जाणे किंवा वगळली जाणे यांसारख्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यावर पारदर्शकपणे कार्यवाही करावी. निवडणूक प्रक्रियेतील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या निवडणुकीत उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाणार नसून पसंतीक्रम मतदान पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांची माहिती मतदारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशासन व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तातडीने माहितीची देवाणघेवाण व समन्वय साधण्यासाठी व्हॉट्सॲप समूहाचा वापर केला जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 29 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर 2026, अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर रोजी, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 9 ऑक्टोबर आहे. प्रत्यक्ष मतदान 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार असून, मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे. मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पात्र मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आली आहे, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून मतदारांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
Source link
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा:विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूचना