Headlines

भाषा वादाचे नव्हे संवादाचे साधन!:तंजावरमध्ये सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलन उत्साहात पडले पार




“भाषा ही माणसाला माणसाशी जोडणारी सर्वांत प्रभावी शक्ती आहे. भाषा हे वादाचे कारण नसून संवादाचे माध्यम आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी केले. तंजावर येथील जगप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आवारातील पेथनन कलैयरंगम सभागृहात आयोजित ‘सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. तमिळनाडूतील तंजावर या ऐतिहासिक भूमीत हे संमेलन नुकतेच दिमाखात पार पडले. संमेलनाचे उद्घाटन तंजावर संस्थानचे प्रमुख श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. सोहळ्याला निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले (तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष), छत्रपती आबाजीराजे भोसले, तसेच स्वागताध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी उच्चशिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील, उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले यांची उपस्थिती लाभली. आपल्या भाषणात डॉ. शरद गोरे म्हणाले, “सध्या देशात जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावर सामाजिक दरी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अशा काळात तंजावरच्या पावन भूमीत भरलेले हे मराठी साहित्य संमेलन भाषेच्या व्यापक आणि विधायक भूमिकेचा महत्त्वपूर्ण संदेश देते.” छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात सांगितले की, या संमेलनाच्या माध्यमातून मराठी आणि तमिळ या दोन महान संस्कृतींचा अनोखा संगम घडत आहे. माणसांना एकमेकांशी जोडण्यात साहित्यिकांची भूमिका मोलाची असून, या संमेलनाने दोन्ही संस्कृतींमधील नाळ अधिक दृढ केली आहे. युवराज संभाजीराजे भोसले म्हणाले, “मराठी आणि तमिळ भाषेत फरक असला तरीही येथील नागरिक अत्यंत मायाळू व आपुलकी जपणारे आहेत. भविष्यात साहित्याच्या माध्यमातून मराठी आणि तमिळची एकत्रित संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” स्वागताध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी छत्रपती सरफोजीराजे यांच्या तमिळनाडूतील ऐतिहासिक कार्याचा गौरव करत मराठी आणि तमिळ या जुळ्या बहिणी असल्याचे सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न उशिरा झाले असले, तरी आता साहित्य क्षेत्रात सातत्याने भरीव काम करून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून विविध राजे आणि मावळ्यांच्या राष्ट्रहिताच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विविध राज्यांतील चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *