![]()
जगात जर्मनी आणि देशात परभणी का म्हणतात, हे मला काल खऱ्या अर्थाने कळले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे परभणीच्या वेशीवर आगमन होताच येथील जनतेने गद्दारांच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारला. परभणीच्या मातीत एकही गद्दार कधी टिकू शकला नाही आणि यापुढेही टिकणार नाही. येथे अनेक आंडू, पांडू आणि बंडू आले अन् गेले; मात्र शिवसेना या ठिकाणी नेहमी मजबुतीने उभी राहिली आहे आणि पुढेही राहील, असा घणाघाती हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. परभणी येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले की, स्वतःला ‘बंडू द बॉस’ म्हणवून घेणारे प्रत्यक्षात काय आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. हा माणूस आज विकासाच्या गप्पा मारतोय. दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार असा सलग 20 वर्षे हा माणूस सत्तेत आहे. पण या 20 वर्षांत त्यांनी मतदारसंघात साधी पिठाची गिरणी सुद्धा सुरू केली नाही. हा माणूस जिल्ह्याचा काय विकास करणार? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तुम्ही परभणीचे दुबई की सिंगापूर करणार का? भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत राऊत पुढे म्हणाले की, स्वतः भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या 12 वर्षांत देशात विकास सापडलेला नाही, मग तुम्हाला तिकडे जाऊन काय सापडणार आहे? तुम्ही तिथे जाऊन परभणीचे दुबई किंवा सिंगापूर करणार आहात का? परभणीत आजवर ज्याने कोणी गद्दारी केली, त्याला येथील जनतेने राजकारणातून गाडल्याशिवाय सोडलेले नाही, हा इतिहास आहे. 2 हजार कोटींचा मालक बंडखोर खासदारांच्या संपत्तीवर बोट ठेवत संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला. कधीकाळी पत्राच्या घरात राहणारा हा माणूस आज 2 हजार कोटी रुपयांचा आसामी बनला आहे, असे मला समजले आहे. ही जी काही आर्थिक ताकद त्यांना मिळाली आहे, ती केवळ शिवसेना आणि ‘ठाकरे’ या नावामुळेच मिळाली आहे, हे त्यांनी विसरू नये. ते म्हणतात की आम्हाला चापट मारून दाखवा; अरे, आम्ही चापट नाही मारणार, तर थेट तुडवणार! ‘ऑपरेशन तुडवा’ हे अशाच लोकांसाठी आहे. गद्दार दिसले तर त्यांना तुडवा, हाच बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिलेला आदेश आहे, असा थेट इशारा राऊत यांनी दिला. सत्ता आली की विकास काय असतो ते दाखवू! संजय राऊत म्हणाले की, परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो शिवसेनेचाच राहील. असे अनेक बंडू येतील आणि जातील. आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे आहे. या भागातून आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाचे 4 आमदार निवडून देण्याची जबाबदारी आता शिवसैनिकांनी घेतली पाहिजे. 2029 मध्ये आपले 100 पेक्षा जास्त आमदार असतील आणि महाराष्ट्रात आपली सत्ता आली की खऱ्या अर्थाने विकास काय असतो, हे आम्ही या गद्दारांना दाखवून देऊ.
Source link
परभणीत एकही गद्दार कधी टिकला नाही:शिवसेना अन् 'ठाकरे' नावामुळेच त्यांना ताकद मिळाली, मोदींना 12 वर्षांत विकास सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार?- संजय राऊत