![]()
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ७ उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यावेळी निवडणुकीमध्ये उबाठा विरुद्ध शिंदेसेना अशी लढत होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये सुमारे 465 मतदान आहे. मात्र यामध्ये महायुतीकडे सुमारे 335 मतदान असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित मतदान महाविकास आघाडीचे असल्याचा दावाही पक्षांकडून केला जात आहे. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादीने जागा मागितली होती, मात्र यापूर्वी या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजय झाल्यामुळे शिंदेसेनेने या ठिकाणी आपला दावा सांगितला होता. येथील जागेवरून राष्ट्रवादी व शिंदेसेनेत धुसफूस सुरू झाली होती. त्यानंतर ही जागा शिंदेसेनेला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांनी दोन अर्ज दाखल केले असून, शिंदेसेनेचे सईद खान यांनी दोन अर्ज दाखल केले आहे. उबाठा विरुद्ध शिंदेसेना अशीच लढत होणार या शिवाय अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुशीलकुमार देशमुख यांनी दोन, विजय जामकर मेहराज खान, विश्वजीत बुधवंत संग्राम जामकर यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता तारीख 4 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणुकीत अडचणीच्या ठरणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी वरिष्ठ व स्थानिक पातळीवरून राजकिय हालचाली गतीमान झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज माघारी नंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या तरी उबाठा विरुद्ध शिंदेसेना अशीच लढत होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मतदारांच्या फुटीचा धोका टाळण्याचे प्रयत्न दरम्यान दोन्ही राजकिय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. आपल्या मतदारांमध्ये फुट पडू नये यासाठी मतदारांवर लक्ष ठेवले जात असून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर मतदारांना सांभाळण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मतदारांच्या फुटीचा धोका टाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उमेदवारी भरताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची अनुपस्थिती दरम्यान आज उमेदवारी दाखल करतांना महायुतीच्या उमेदवारा सोबत राष्ट्रवादीचे नेते नसल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून एकजूट दाखविण्याचे प्रयत्न केले जात आहे. सध्या तरी निवडणुकीत आपल्या उमेदवारच्या विजयासाठी गणिते मांडली जात आहेत. निवडणुकीत राजकिय बलाबल पुढील प्रमाणे राष्ट्रवादी : १३१ मतदार भाजपा : ९९ मतदार शिवसेना : ७७ मतदार काँग्रेस : ५९ मतदार उबाठा : ४३ मतदार यशवंत सेना : २७ मतदार जनसुराज्य : १३ मतदार रासप : ५ मतदार अपक्ष : ६ मतदार
Source link
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:7 उमेदवारांचे 10 अर्ज दाखल, ठाकरे गट आणि शिंदेसेनेतच होणार लढत