Headlines

पर्यटन विकासासाठी चित्रपटांचे माध्यम उपयुक्त:ओम राऊत यांचे मत, परभन्नाच्या 5 व्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा समारोप




“पर्यटन आणि लघुपट-चित्रपटनिर्मिती ही परस्परपूरक क्षेत्रे ठरू शकतात आणि त्यामध्ये युवा दिग्दर्शकांसाठी अनेक नव्या संधी आहेत. त्या संधींचा योग्यप्रकारे लाभ उठवायला हवा, असे मत प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते ओम राऊत यांनी व्यक्त केले. पर्यटन आणि चित्रपट, या दोन्ही ठिकाणी आपण एक गोष्ट सोबत घेऊन येतो, जी आपल्याला जागे करते, संवेदनशील बनवते, जाणिवा समृद्ध करते, असेही ते म्हणाले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाऊंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथील यशदामध्ये आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी ओम राऊत यांना ‘परभन्ना विशेष योगदान पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे आणि माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विहार ट्रॅव्हल्सचे दीपक पुजारी यांना ‘परभन्ना जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. तो ऋषिकेश पुजारी यांनी स्वीकारला. समारोपावेळी महोत्सवाचे प्रमुख संयोजक गणेश चप्पलवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रनगरीचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, परीक्षक वैशाली केंदळे आणि डाॅ. अनमोल कोठडिया, तर उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ संपादक संजय आवटे, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष सचिन इटकर, पुणे पर्यटन विभागाचे उपसंचालक भरत लांघी, महोत्सवाचे सल्लागार प्रा. राजीव घोडे, फाउंडेशनचे सचिव मनीषा उगले आदी उपस्थित होते. ‘चित्रपटांच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रसार’ या संकल्पनेवर आधारित या दोन दिवसीय महोत्सवात लघुपट प्रदर्शनासह मुलाखती, परिसंवाद, समूहचर्चा आणि मास्टरक्लास अशी संवादात्मक सत्रे झाली. दोन दिवसांत २६ लघुपट, माहितीपटांचे स्क्रिनींग झाले. निवडक ५० छायाचित्रांचे प्रदर्शन लागले होते. यंदाच्या महोत्सवात लघुपट, माहितीपट, व्हीलॉग आणि विद्यार्थी चित्रपट, अशा विभागांत पुरस्कार देण्यात आले. सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रथम पुरस्कार ‘द रिकार्ड डान्स’ला, तर सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार ‘केकी’ या लघुपटाला मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार माहितीपटासाठी नीलेश कुंजीर, तर लघुपटासाठी तुषार उडेग यांना मिळाला. शशांक शेंडे यांनी सर्जनशील निर्मितीमध्ये आशय सर्वात महत्त्वाचा असून, तो लघुपटांतून जपण्याचे आवाहन केले. शेखर गायकवाड म्हणाले, पर्यटनाच्या संकल्पना बदलत आहेत. नवी पिढी आता केवळ स्थळदर्शन न करता, तेथील विशिष्ट अनुभवाला प्राधान्य देत आहे. यशदामधील सर्व प्रशिक्षणांचा प्रारंभ कुठल्यातरी औचित्यपूर्ण लघुपट, माहितीपटानेच होतो. आपल्याकडे प्रत्येक गावाचे ब्रँडिंग होणे आवश्यक आहे, इतकी विविधता आणि वेगळेपण आहे. ते नेमकेपणाने ओळखून मांडण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *