Headlines

कोल्हापुरात पूर्व सैनिकांची 27 वी राष्ट्रीय सभा:28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेशांतील 350 प्रतिनिधी सहभागी; मेजर जनरल जोशी उद्घाटन करणार




अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेची 27 वी राष्ट्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा 2 ते 4 ऑक्टोबरदरम्यान कोल्हापूर येथील श्री क्षेत्र कणेरी मठात होणार आहे. देशभरातील 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे 350 पूर्व सैनिक प्रतिनिधी या सभेत सहभागी होणार आहेत. माजी सैनिकांचे कल्याण, राष्ट्रसेवा, सामाजिक उपक्रम, संघटनात्मक विस्तार आणि आगामी योजनांवर यावेळी विचारमंथन होणार आहे. सभेचे उद्घाटन मेजर जनरल धनंजय जोशी (एव्हीएसएम, व्हीएसएम, कमांडंट, इन्फंट्री स्कूल) यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णूकांत चतुर्वेदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख व संस्थेचे मार्गदर्शक प्रदीप जोशी, महाराष्ट्र-गोवा अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. माजी सैनिकांच्या कॅन्टीन, पेन्शन आणि ईसीएचएसशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीतील सेना मुख्यालयातील अधिकृत अधिकारीही सभेला उपस्थित राहणार असून, ते माजी सैनिकांशी संवाद साधणार आहेत. प्रलंबित प्रश्न आणि कल्याणकारी योजनांबाबत माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. सभेत संस्थेच्या मागील वर्षातील कामाचा आढावा, संघटनात्मक विस्तार, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न, ग्रामीण भागातील सेवा कार्य, युवा पिढीशी संवाद आणि आगामी वर्षातील कार्यक्रमांचे नियोजन यावर चर्चा होईल. याशिवाय ‘नमस्ते शौर्य फाउंडेशन’, मुंबईतर्फे 1971 च्या युद्धातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबरला प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय सभेचा समारोप 4 ऑक्टोबरला होणार असून राज्याचे मंत्री शंभूराज देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर युनिटचे अध्यक्ष विलास सुळकुडे, अण्णासाहेब कुंभार, मुकुंद पिसे आणि दादासाहेब किल्लेदार यांनी ही माहिती दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *