![]()
विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद- पुणे २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या परिषदेबाबत माहिती देणाऱ्या www.thewisdominmotion.org या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. बौद्ध महिला परिषदेच्या आयोजन समितीच्या डॉ. उज्ज्वला आंदुरकर (प्रसिद्ध भूलतज्ज्ञ), डॉ. संध्या हरिभक्त (बालरोगतज्ज्ञ), डॉ. वैशाली भामरे तसेच लक्ष्मीकांता माने (पाली व बौद्ध अध्ययनाच्या अभ्यासक) यांनी याबाबत माहिती दिली. विविध देशातील सहभागी वक्ते, नोंदणी प्रक्रिया, परिषद आयोजित करण्यापाठीमागे उद्देश याबाबतची माहिती या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. व्हिएतनाम, श्रीलंका, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील नामांकित भिक्खुनी तसेच विविध क्षेत्रांतील गाढे अभ्यासक या परिषदेत वक्ते आणि चर्चासत्रातील सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. बौद्ध धम्माचा तसेच भगवान बुद्धांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रचार- प्रसार, तसेच विविध देशांतील बौद्ध अभ्यासक, भिक्खू, संशोधक आणि अनुयायांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. भारत आणि परदेशातील बौद्ध भिक्खू-भिक्खूणी, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक, कलाकार, सामाजिक नेते आणि धम्म-साधक एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. विद्यार्थी, संशोधक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी किंवा धम्माचे जिज्ञासू तसेच अभ्यासकांना शिकण्याची, अभ्यासाची आणि प्रेरणा मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. परिषदेसाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या देश-विदेशातील नागरिक आणि बौद्ध अनुयायांना संकेतस्थळामुळे परिषदेसंदर्भातील माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. परिषदेसाठी धम्मदान देण्याची सुविधाही या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ७८८८१२९१६९ आणि ८९७५७३८६३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Source link
सामाजिक न्याय मंत्र्यांनी बौद्ध महिला परिषदेच्या वेबसाइटचे केले लोकार्पण:'आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद- पुणे 2026', 17 ऑक्टोबरला; व्हिएतनाम, श्रीलंका, कोरियातून भिक्खुनी येणार