![]()
आजच्या काळात मध्ये सोशल मिडियाचा उपयोग व्यापक स्वरुपात बालक व युवा पिढी करीत आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम लक्षात घेता पालकांनी जागरूक राहून पाल्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दामीनी पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी येथे केले. हिंगोली येथील एनटीसी भागातील श्री सिद्धीविनायक सार्वजनिक बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित निबंध, वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पालकांची कर्तव्य, वाढता सोशल मिडियाचा उपयोग व तरुणाईवर होणार परिणाम यावर मार्गदर्शन केले. सध्या सर्वच क्षेत्रात सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही मोबाईलची मोठी क्रेझ पहावयाला मिळत आहे. मुलांच्या हट्टापोटी पालकही त्यांना स्मार्टमोबाईल घेऊन देत आहे. मात्र या स्मार्टमोबाईलचा पाल्यांकडून कसा वापर केला जात आहे, त्यावर तो काय पाहतो, अभ्यास किंवा इतर शैक्षणिक माहिती ऐवजी इतर काय माहिती पाहतो त्यानुसार त्याचे अनुकरण करतो काय याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ आपल्याकडे वेळ नाही असे सांगत पाल्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे वेगळेच परिणाम दिसू लागलीत, पालकांचे दुर्लक्ष होत असल्याने मुले भरकटण्याची भिती असते . त्यामुळे पालकांनी दिवसभरात वेळ काढून पाल्यांकडे लक्ष द्यावे तसेच त्याच्याशी नियमित संवाद ठेऊन त्याच्या अडचणी, त्याचे प्रश्न जाणून घेत त्याला चांगले वाईट याबाबी शिकविणे आवश्य आहे. शाळा, महाविद्यालयात पाल्या कोणा सोबत राहतो, त्याचे मित्र कोण आहेत याची माहितीही पालकांनी ठेवली पाहिजे असे त्यांनीसांगितले. संस्कारीत पिढी तयार करण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांकडे लक्ष देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महिलांच्या अत्याचार, मुलींना पोलिसाकडून तत्परतेची मदत याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी केले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
सोशल मिडीयाच्या अतिवापराचा दुष्परिणाम:पाल्यांच्याबाबतीत पालकांनी जागरूक राहणे काळाची गरज- सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप