![]()
निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाविषयी भारतीय नागरिकांमध्ये असलेल्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारा नवा अहवाल समोर आला आहे. एचडीएफसी पेन्शन (HDFC Pension) आणि इप्सोस (Ipsos) यांनी जारी केलेल्या ‘एनपीएस प्राधान्य निर्देशांक 2026’ अहवालानुसार, भारतीयांना निवृत्तीनंतर लागणाऱ्या प्रत्यक्ष निधीचा अंदाज अजूनही खूप कमी लावण्याची सवय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (PFRDA) अध्यक्ष एस. रमण आणि एचडीएफसी पेन्शनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम अय्यर यांच्या हस्ते या सविस्तर अहवालाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. निवृत्तीसाठी ‘1.5 कोटी’ चा अंदाज, पण वास्तव वेगळेच! संशोधनानुसार, भारतीयांच्या मते निवृत्तीनंतरच्या उर्वरित आयुष्यासाठी सरासरी 1.5 कोटी रुपयांचा निधी पुरेसा ठरेल. 2023 मध्ये हाच अंदाज 1.34 कोटी रुपये इतका व्यक्त केला गेला होता. मात्र, आर्थिक तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार कुटुंबाच्या सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत ही रक्कम 10 पटींपेक्षाही कमी आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरचा प्रत्यक्ष खर्च आणि नागरिकांनी लावलेला अंदाज या दोघांमध्ये मोठी तफावत कायम असल्याचे अहवालातून समोर आले आहे. ‘एनपीएस’बाबत नागरिकांमध्ये जागृती वाढली नॅशनल पेन्शन सिस्टीमचा (NPS) प्राधान्य निर्देशांक 0 ते 100 च्या गुणपट्टीवर 57 वर पोहोचला आहे. 2023 मध्ये हा निर्देशांक 54 अंकावर होता. भारतीय नागरिक आता या योजनेची केवळ वरवरची माहिती न ठेवता त्याकडे एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून गांभीर्याने पाहू लागले आहेत. उत्तर भारत आघाडीवर: प्रादेशिक पातळीवर उत्तर भारताने 60 अंकांसह सर्वोच्च स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल पूर्व भारत 58, दक्षिण भारत 57 आणि पश्चिम भारत 54 अंकांवर आहे. गुंतवणूकदारांचा ‘एनपीएस’कडे कल का वाढतोय? आरोग्य खर्चाची मोठी भीती अभ्यासात सहभागी झालेल्या 47% नागरिकांनी निवृत्तीनंतर वाढणारा वैद्यकीय खर्च आणि 44% लोकांनी वयोमानानुसार येणाऱ्या आजारपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, अजूनही 69% नागरिक निवृत्तीनंतरच्या आर्थिक आधारासाठी आपल्या मुलांवर किंवा कुटुंबावर अवलंबून राहण्याची अपेक्षा ठेवतात. “भारतात निवृत्तीपश्चात आर्थिक नियोजनाबाबत हळूहळू जनजागृती होत आहे. एनपीएस प्राधान्य निर्देशांकातील वाढ सकारात्मक आहे. मात्र, नागरिकांनी केवळ माहिती न घेता प्रत्यक्ष नावनोंदणी करून वेळेत आपल्या निवृत्ती निधीची उभारणी करणे अत्यंत गरजेचे आहे.”— श्रीराम अय्यर, व्यवस्थापकीय संचालक व सीईओ, एचडीएफसी पेन्शन
Source link
निवृत्तीसाठी 1.5 कोटी पुरेसे आहेत का?:भारतीयांच्या अंदाजावर HDFC पेन्शनच्या 'NPS Index 2026' अहवालातून मोठा खुलासा!