Headlines

ज्ञानेश कुमारांच्या भूमिकेवरून ठाण्यात राष्ट्रवादी आक्रमक:गाढवावर बसवून प्रतिकात्मक धिंड, जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी




निवडणूक आयोगाच्या कारभारावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर गेल्या 10 महिन्यांत किमान 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाण्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी ज्ञानेश कुमार यांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला गाढवावर बसवून प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. तर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांची वेशभूषा केलेल्या व्यक्तींचा घोड्यावरून सत्कार करण्यात आला. नेमका वाद काय? निवडणूक मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR प्रक्रियेवरून हा वाद निर्माण झाला आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या तपासणी अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगातील काही निर्णय आणि प्रक्रियांबाबत किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले. हे आक्षेप मतदारांची नावे जोडणे, वगळणे, पुन्हा समाविष्ट करणे, मतदार यादीच्या डेटाबेसचा वापर आणि नव्या मतदारांच्या नोंदणीशी संबंधित होते. यातील एक महत्त्वाचा मुद्दा फॉर्म-6 मध्ये करण्यात आलेल्या बदलाचा आहे. नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या व्यक्तींसाठी असलेल्या या फॉर्ममध्ये SIR शी संबंधित माहिती विचारण्यात आली होती. या बदलावर दोन्ही आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. संधू यांनी हा बदल ‘अनधिकृत’ आणि ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटल्याचे वृत्त आहे. दोन आयुक्तांचे आक्षेप कशावर? आयोगातील अंतर्गत पत्रव्यवहाराचा हवाला देत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, काही निर्णय घेताना दोन्ही आयुक्तांना पुरेशी माहिती देण्यात आली नसल्याची त्यांची तक्रार होती. मतदार यादीच्या डेटाबेसचे नियंत्रण हळूहळू केंद्रीकृत होत असल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही बाबींमध्ये त्यांनी केंद्रीय सचिवांकडेही चिंता व्यक्त केल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने या आरोपांना वेगळे स्पष्टीकरण दिले आहे. आयुक्तांनी केलेल्या सूचना आणि प्रश्न हे निर्णय घेण्यापूर्वीच्या प्रक्रियेतील नियमित प्रशासकीय बाबी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. SIRसह मागील वर्षातील सर्व निर्णय पूर्ण आयोगाच्या एकमताने झाल्याचा दावा आयोगाने केला आहे. ठाण्यात नेमके काय घडले? या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाण्यात पक्ष कार्यालयापासून ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. आंदोलनादरम्यान ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. ज्ञानेश कुमार यांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला गाढवावर बसवण्यात आले. गाढवाच्या गळ्यात ‘एक तडीपार चंद्रावर… ज्ञानेश कुमार गाढवावर’ असा फलक लावण्यात आला होता. दुसरीकडे सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या वेशभूषेतील व्यक्तींना घोड्यावर बसवण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आला. मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘SIR हटाओ, देश बचाओ’च्या घोषणा आंदोलनात ‘ज्ञानेश हटाव, निवडणूक आयोग बचाव’, ‘वोट चोर, गद्दी छोड’, ‘SIR हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणा देण्यात आल्या. ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेविरोधात कारवाई करण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, निवडणूक आयोगातील या कथित मतभेदांनंतर विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणावरून देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने मात्र दोन आयुक्तांनी केलेल्या सूचना या नियमित निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता SIR प्रक्रिया, मतदार यादीतील बदल आणि आयोगाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेवर पुढील काळात आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरून कायदेशीर पातळीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाल्याचे वृत्त आहे. या याचिकेत निवडणूक नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे, मतदार यादीचा डेटाबेस आणि संबंधित सॉफ्टवेअर प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हेही वाचा…. डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात हातोडा, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी!:गच्चीवरून प्रवेश करत पाण्याच्या टाकीचे कनेक्शन तोडले; पहाटेच्या सुमारास धुमाकूळ महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी एका अज्ञात तरुणाने बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 26 सप्टेंबर रोजी घडली. पहाटे 3 वाजेच्या सुमारास या घुसखोराने बंगल्याच्या गच्चीवरून आत प्रवेश केला. त्यानंतर सकाळी 6.15 च्या सुमारास ही बाब लक्षात आल्यावर, सकाळी 7 वाजता बंगल्यावरील सुरक्षारक्षक आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी या संशयिताला रंगेहात पकडले. या घटनेमुळे डॉ. गोऱ्हे यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *