![]()
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिस चौकशीत केलेले खुलासे अधिकच धक्कादायक ठरत आहेत. चौकशीदरम्यान अयानने पहिल्या ब्रेकअपनंतर मी प्लेबॉय बनलो, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार मानसिक आजारामुळे नव्हे, तर चुकीच्या जीवनशैलीतून आणि विकृत विचारसरणीतून घडलेला आहे. तपासात असे समोर आले आहे की, अयान अहमद सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रिय होता. त्याचे 18 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते आणि तो स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून सादर करत होता. पेड प्रमोशनच्या माध्यमातून तो पैसे कमवत होता. याशिवाय मोबाईल विक्रीचा व्यवसायही तो करत होता. मात्र, महागडी जीवनशैली आणि मुलींवर खर्च करण्याची सवय यामुळे तो सतत पैसे उधार घेत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. अयानने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून तरुणींना आकर्षित करण्याचा मार्ग अवलंबला होता. तो सुरुवातीला मुलींशी मैत्री करत असे आणि चार ते पाच महिने सातत्याने संवाद साधत त्यांचा विश्वास जिंकत असे. विश्वास निर्माण झाल्यानंतर तो त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असे किंवा त्यांना दबाव टाकून संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनेक तरुणी अशा प्रकारे त्याच्या जाळ्यात अडकल्या असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अयान अहमद हा एमआयएम पक्षाच्या अमरावती युनिटचे सोशल मीडिया हँडल देखील सांभाळत होता. मात्र, त्याचे नाव या गंभीर गुन्ह्यात समोर आल्यानंतर संबंधित पक्षाने तातडीने त्याला पदावरून हटवले असल्याचेही समजते आहे. या कारवाईमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून सध्या अयानच्या मोबाईलमधील डेटा, चॅट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. या माध्यमातून आणखी पीडित तरुणींची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अयानच्या हायफाय जीवनशैलीमागील आर्थिक स्रोतांचाही तपास सुरू आहे. पीडितांना पुढे येण्याचे आवाहन दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, सोशल मीडियाच्या आडून चालणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजासमोर गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे.
Source link
पहिल्या ब्रेकअपनंतर बनला प्लेबॉय:अयान अहमदचे धक्कादायक कबुलीजबाब; एमआयएमचे सोशल मीडिया हँडल देखील सांभाळत होता