![]()
पालकमंत्री असो अथवा नसो, संकटकाळात आणि शहराच्या विकासासाठी मी नाशिकमध्ये नेहमीच हजर असतो. येत्या सहा महिन्यांत नाशिक शहरातील सर्व रस्ते आणि प्रलंबित कामे पूर्ण केली जातील, असा ठाम विश्वास राज्याचे ग्रामविकास व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांना थेट इशारा देत “आता कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. गिरीश महाजन यांनी आज नाशिकमधील विकासकामे, पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. नाशिकमधील पावसाची परिस्थिती आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता महाजन यांनी प्रशासनाला तातडीने कामाला लागण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. “निधी आणि परवानग्यांची अजिबात चिंता करू नका. कॉलनीमधील रस्ते व खड्डे तातडीने दुरुस्त करा,” अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. काम सुरू असताना संबंधित अधिकारी घटनास्थळी (स्पॉटवर) उपस्थित असलेच पाहिजेत. नाशिककरांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये यासाठी पोलीस आणि नागरी प्रशासनाने पूर्णपणे अलर्ट राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. ४० हजार कोटींतून ‘मॉडर्न नाशिक’ साकारणार आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेताना महाजन यांनी कुंभमेळा मंत्री म्हणून कामाच्या वेगावर भर दिला. “कुंभमेळ्याला आता अवघा एकच वर्ष उरले असल्याने कामांची प्रचंड घाई आहे. यापूर्वी कधीही झाली नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे शहरात सुरू आहेत. सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्च करून नाशिकचा चेहरामोहरा बदलला जात आहे. डांबरी रस्ते टिकत नसल्याने व्हाइट टॉपिंग रस्ते तयार केले जात आहेत. एका रस्त्याखाली सात प्रकारच्या युटिलिटी लाईन टाकून आधुनिक व मॉडर्न नाशिक उभारले जात आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. ‘बिलो’ टेंडर काढणाऱ्या ठेकेदारांना बंद खोलीत डोस कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये दर्जाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी कंत्राटदारांच्या ३० ते ३५ टक्के ‘बिलो’ टेंडर भरण्यावर तीव्र चिंता व्यक्त केली. “सर्व ठेकेदारांना उद्याच्या बैठकीला बोलावले आहे. बंद खोलीत त्यांना काय सांगायचे ते मी सांगतो. ३०-३५ टक्के बिलो जाऊन दर्जेदार कामे कशी होणार?” असा सवाल त्यांनी केला. टेंडर रद्द करण्याचे संकेत कामाचा दर्जा तपासला गेलाच पाहिजे. निकृष्ट कामे आढळल्यास काही टेंडर थेट रद्द करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, असे महाजन म्हणाले. व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दरम्यान, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता, संबंधित व्यक्तीचा पक्षाशी आता कोणताही संबंध नसल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्या व्यक्तीला पक्षातून बाहेर काढण्यात आले असून, विविध लोकांच्या संभाषणांच्या ध्वनिचित्रफिती किंवा ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्याच्या बाबी समोर आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्या प्रकरणाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले. हे ही वाचा… नाशिक शहर वाऱ्यावर सोडलंय का?:खड्ड्यांमुळे 5 जणांच्या मृत्यूवर छगन भुजबळ संतापले, म्हणाले- हे शासन आणि महापालिकेच्या हलगर्जीपणाचा बळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकारावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “नाशिकमध्ये एवढे खड्डे आणि एवढं बेक्कार नाशिक कधीही नव्हतं. हे शहर काय वाऱ्यावर सोडलंय का? लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका,” असा थेट इशारा भुजबळांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. सविस्तर वाचा… नीतेश राणेंकडून तुकाराम मुंढेंचे कौतुक:म्हणाले – ते फक्त कायद्याचे पालन करताहेत; भांडूपचा देवानंद म्हणत संजय राऊतांवरही टीका अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचे समर्थन करत राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी त्यांचे मोकळेपणाने कौतुक केले आहे. “तुकाराम मुंढे हे काही वेगळे करत नसून, ते केवळ कायदा, नियम आणि सरकारी निर्णयांचे काटेकोर पालन करत आहेत,” असे स्पष्ट मत राणे यांनी व्यक्त केले. यासोबतच खासदार संजय राऊत आणि काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवरही त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत राजकीय प्रहार केला. सविस्तर वाचा…
Source link
पालकमंत्री असो वा नसो, नाशिकसाठी मी कायम हजर:40 हजार कोटींतून 'मॉडर्न नाशिक' साकारणार – गिरीश महाजन