![]()
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘छगन भुजबळांना पालकमंत्री करा’ अशी मागणी करणारे होर्डिंग लावल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या मागणीपासून स्वतःला दूर ठेवत मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित फ्लेक्स तत्काळ काढण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले, “भुजबळांना पालकमंत्री करा, याचा अर्थ मीच पालकमंत्री व्हावे असा नाही. ज्यांनी माझ्या नावाचे फ्लेक्स लावले, त्यांच्याबद्दल मी नापसंती व्यक्त केली असून ते तत्काळ काढण्यास सांगितले आहे.” नाशिकमध्ये समस्या असल्याचे भुजबळांनी मान्य केले नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगत भुजबळ म्हणाले की, शहरात आणि जिल्ह्यात समस्या आहेत, हे नाकारता येणार नाही. कुंभमेळा प्राधिकरण, महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. ते म्हणाले, “पाऊस थांबताच तातडीने खड्डे बुजवले पाहिजेत. एका बाजूला रस्त्याची कामे सुरू असतील तर दुसऱ्या बाजूचा रस्ता सुरळीत ठेवला पाहिजे. दोन्ही बाजूंनी रस्ते खराब झाल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.” ‘लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्या’ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत भुजबळ म्हणाले की, नगरसेवक, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधीही या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत. प्रशासनाने विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या मतदारसंघातील समस्या सोडवाव्यात, असेही त्यांनी सुचवले. ओबीसी मंडल जनगणना यात्रेवर प्रतिक्रिया भंडाऱ्यातून सुरू झालेल्या मंडल जनगणना यात्रेबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, “1991 पासून आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता ते काम पूर्ण झाले पाहिजे. मात्र, मला या यात्रेचे निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलणार नाही.” धर्मस्वातंत्र्य कायद्यावर सावध भूमिका महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याबाबत आणि त्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीबाबत विचारले असता भुजबळ यांनी सावध भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, आपण अद्याप संपूर्ण कायदा वाचलेला नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. ते म्हणाले, “जो कायदा बनवण्याचा योग्य मंच आहे, तिथेच या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. न्यायालयात प्रकरण गेल्यास त्यावर न्यायालय योग्य निर्णय घेईल.” पंकजा-धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यांवर काय म्हणाले? राजकारणातून निवृत्तीबाबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यांवर भुजबळ म्हणाले की, सध्याच्या राजकारणात जात आणि धर्माचे प्रश्न वाढले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, अशा परिस्थितीत राजकारणातून पळ काढण्याऐवजी व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘पुतण्या पंतप्रधान होईल’ वक्तव्यावर मिश्कील प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी केलेल्या “माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “अनेक शुभेच्छा देणारे असतात. पण अशा गोष्टी सार्वजनिकपणे बोलू नयेत. अशा वक्तव्यांमुळे संबंधित व्यक्तीचेच नुकसान होऊ शकते.” दरम्यान, नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत भुजबळ यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा रेल्वे प्रवास कमीत कमी वेळेत होईल, अशा पद्धतीने मार्गाची आखणी व्हावी, असे त्यांनी सांगितले. खड्डे बुजवण्याचे ‘शास्त्र’ सांगितले रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबतही भुजबळ यांनी तांत्रिक सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, खड्डा जसा आहे तसाच भरल्याने तो पुन्हा उखडतो. खड्डा चौकोनी करून, आवश्यक तेवढा खोल करून, योग्य पद्धतीने ‘कोल्ड मिक्स’ दाबून भरल्यास तो पुन्हा उखडत नाही. अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी ही पद्धत अवलंबावी, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे छगन भुजबळ यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही खड्ड्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत 7 ऑगस्ट रोजीच्या विशेष महासभेसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून प्रशासनाला जाब विचारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न आता प्रशासनापुरता मर्यादित न राहता मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. हेही वाचा… पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले: मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का? जर संसद चालवायचीच नव्हती, तर संसदेची नवीन इमारत कशासाठी उभारली? त्यांनी सोशल मीडियावरच संसद चालवावी, असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
'पालकमंत्री करा'च्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका:म्हणाले- 'फ्लेक्स काढायला सांगितले, नाशिकच्या खड्ड्यांकडे लक्ष द्या'