Headlines

पिण्याच्या पाण्यासाठी हिंगोलीत अनोखे आंदोलन:जि. प. शाळेतील 200 विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाने नेसली साडी




कळमनुरी तालु्क्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पिण्यासाठी पाणीच नसल्याने 200 विद्यार्थ्यांचा घसा कोरडा पडू लागला आहे. खिचडी खाल्यानंतर पाणी पिण्यासाठी घरी जावे लागत असल्याने संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने साडी नेसून विद्यार्थ्यांसह बुधवारी ता. 12 ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाची तालुक्यात मोठी चर्चा सुरु झाली आहे. कळमनुरी तालु्क्यातील वडगाव येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शाळा असून या ठिकाणी दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी बोअर होता मात्र त्यातील विद्युतपंप काढल्याने बोअर निकामी झाला आहे. तर शाळेत नळ जोडणी असली तरी या ठिकाणी पिण्याचे शुध्द पाणी मिळत नाही. गावातील सांडपाणी नळ योजनेच्या विहिरीत जाते अन तेच पाणी पुन्हा नळाद्वारे पिण्यासाठी दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने विद्यार्थी हे पाणी पिण्यासाठी वापरत नाही. दरम्यान, शाळेत पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत खिचडी खाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी घरी यावे लागत आहे. शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायतीकडे केली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. दरम्यान, गावातील जिल्हा परिषद शाळेत पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर जाधव, भगवान तरटे, बाजीराव देशमुख, बळीराम तरटे, संतोष देशमुख, भास्कर मगर, अरविंद सुर्यवंशी, परीक्षित मगर, जीवन मगर, प्रकाश तरटे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. यावेळी समितीचे अध्यक्ष जाधव हे साडी नेसून व कडेवर रिकाम्या घागरी घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेला मोर्चा ग्रामपंचायतीजवळ आला. यावेळी ग्रामपंचायतीला कुलुप असल्याने पाण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या दरवाजाजवळ ठेऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *