Headlines

सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे एकाच गाडीतून रवाना:जलजीवन मिशनच्या बैठकीतून दोघेही बाहेर; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना पुन्हा उधाण




दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि भाजप यांच्यातील वाढत्या जवळीकीच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुकतीच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीची चर्चा ताजी असतानाच, आता दिल्लीत सुप्रिया सुळे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसल्याने राजकीय तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये (NDA) सहभागी होणार असल्याच्या अफवा राजकीय वर्तुळात फिरत असून, या ताज्या घडामोडीमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. चालू बैठकीतून अचानक ‘एक्झिट’ दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे ‘जलजीवन मिशन’ संदर्भात राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला दोन्ही बाजूंचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, ही बैठक सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेते विनोद तावडे अचानक बैठकीतून बाहेर पडले. महाराष्ट्र सदनातून बाहेर पडल्यानंतर हे दोन्ही बडे नेते एकाच कारमध्ये बसून पुढील प्रवासाला निघून गेले. शरद पवारांच्या पक्षात कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यामागे सुप्रिया सुळेंचा मोठा प्रभाव असतो, तर विनोद तावडे हे भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील कोअर कमिटीतील अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. या दोन नेत्यांच्या एकत्रित प्रवासामुळे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. पंतप्रधान मोदींची भेट आणि वाढती जवळीक (पार्श्वभूमी) सुळे-तावडे यांच्या या प्रवासाला अलीकडच्या राजकीय घडामोडींची मोठी पार्श्वभूमी आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात नुकतेच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर लगेचच शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला स्वतः पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या सर्व घटनाक्रमामुळे भाजप आणि पवार गटामध्ये काहीतरी राजकीय शिजत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नेत्यांकडून सारवासारव: कोल्हे आणि तटकरे काय म्हणाले? या घटनेनंतर राजकीय चर्चा सुरू होताच नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. अमोल कोल्हे म्हणाले, “सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे संसदेच्या केवळ एका दुसऱ्या बैठकीला जात होते. यात कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.” तर सुनील तटकरे म्हणाले, “दोन्ही नेत्यांची ‘स्टँडिंग कमिटीची’ (स्थायी समितीची) बैठक एकाच वेळी असल्याने ते एकत्रितपणे गेले असावेत.” जलजीवन मिशनच्या बैठकीत गदारोळ दरम्यान, महाराष्ट्र सदनातून ज्या बैठकीतून हे नेते बाहेर पडले, त्या ‘जलजीवन मिशन’च्या बैठकीत मोठा गदारोळ झाल्याचे समोर आले आहे. जलजीवन मिशनचा वाढता खर्च पाहता, केंद्राने ५० टक्के आणि राज्याने ५० टक्के खर्च उचलावा, अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील खासदारांनी लावून धरली. याच निधीच्या मुद्द्यावरून बैठकीत उपस्थित असलेले राज्याचे मंत्री आणि केंद्रातील मंत्री यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘डीलिमिटेशन’ विधेयकाचे कनेक्शन? पुढच्या आठवड्यात संसदेत ‘डीलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक पटलावर येण्याची शक्यता आहे. या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील शरद पवार गटाच्या नेत्यांच्या अशा भेटीगाठी वाढल्याने, राजकीय वर्तुळाचे लक्ष या सर्व घडामोडींकडे लागले आहे. हेही वाचा… तुकाराम मुंढेंचा मोठा दणका: मुंबईसह राज्यभरात डॉमिनोज पिझ्झाचे 5 परवाने निलंबित; गोंदियातील 4 आयुर्वेदिक कंपन्यांवरही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कडक मोहीम राबवली जात आहे. आता एफडीएने आपला मोर्चा थेट मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सकडे वळवला असून, अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘डॉमिनोज् पिझ्झा’च्या मुंबईसह राज्यभरातील 5 आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने रद्द (निलंबित) केले आहेत. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील 4 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेही कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *