Headlines

पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2.39 कोटींचा गांजा जप्त:आंतरराज्यीय तस्कर अटकेत, 634 किलो गांजा हस्तगत




पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 कोटी 39 लाख रुपये किमतीचा 634 किलो गांजा जप्त केला असून, एकूण 3 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समाधान धर्मराज गायकवाड, विकी उर्फ पप्पू कांबळे (मुख्य सूत्रधार), प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, संग्राम उर्फ चंदन सिंग, जॉकी माझी, हुसेन सुखदेव लष्करे, आदित्य विकास शिंदे आणि युवराज ज्ञानेश्वर दुर्गे यांचा समावेश आहे. जॉकी माझी हा मूळचा ओडिशाचा, तर प्रिन्स हा बिहारचा रहिवासी आहे. आरोपी जॉकी माझीच्या मदतीने विकी कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी छत्तीसगडमधून गांजा आणला होता. त्यांनी पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये या गांजाची विक्री केली होती. बारामती परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला होता. लष्करे, शिंदे आणि दुर्गे हे कोथरूड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आंतरराज्यीय गांजा तस्करी करणारी ही टोळी पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या गांजा विक्रेत्यांना गांजा पुरवत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी सिंग आणि कांबळे हे दोन मोटारीतून गांजा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पंढरपूर-फलटण मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. एक मोटार सांगलीकडे गेल्याने, सांगली पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सापळा लावून दोन्ही मोटारी अडवून आरोपींना अटक केली. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, अभिजित एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, स्वप्नील अहिवळे, नीलेश शिंदे, अजय घुले, रत्नदीप भंडारे, रामचंद्र शिंदे आणि सुलतान डांगे यांच्या पथकाने केली. ही टोळी कोणाला गांजा विक्री करत होती, याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *