Headlines

पुणे पोलिसांकडून 2 गुन्हेगार टोळ्यांवर 'मोका':राजगड, शिरूरमध्ये दहशत माजवणाऱ्या सराईतांवर कारवाई




पुणे ग्रामीण पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई करत राजगड आणि शिरूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दोन कुख्यात गुन्हेगार टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) लागू केला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या कारवाईमुळे खंडणी, मारहाण, दहशत आणि बळजबरी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मण इंगुळकर व त्याच्या टोळीविरुद्ध मोका लागू करण्यात आला आहे. या टोळीवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, धमकावणे, खंडणी, शस्त्रांचा वापर तसेच संघटित गुन्हेगारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत योगेश केशव मचाले व त्याच्या टोळीवरही मोका कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवरही खंडणी, दहशत माजविणे, प्राणघातक हल्ले, मारहाण, शासकीय कामात अडथळा आणणे आणि मालमत्तेचे नुकसान अशा गंभीर स्वरूपाचे तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत. टोळीतील सात आरोपींपैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे. दोन्ही टोळ्यांच्या कारवायांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सातत्याने गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, संबंधित पोलीस ठाणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रस्ताव तयार केला होता. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, राजगड व शिरूर पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. संघटित गुन्हेगारीविरोधात यापुढेही कठोर भूमिका कायम ठेवत अशा टोळ्यांवर सातत्याने कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *