![]()
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ देण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र शिक्षक ८ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आपले प्रस्ताव ऑनलाइन सादर करू शकतील. पुणे महापालिका तसेच अनुदानित खासगी शाळांमधील विविध माध्यमांच्या शिक्षकांना यासाठी अर्ज करता येणार आहे. उपआयुक्त (प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण) वसुंधरा बारवे आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी याबाबत माहिती दिली. यंदा एकूण ४० शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाईल. यात महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील २५, अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील पाच, अनुदानित खासगी माध्यमिक शाळांमधील पाच आणि महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील पाच शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्काराची निवड प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित असेल. प्राप्त प्रस्तावांचे १०० गुणांवर मूल्यांकन केले जाईल. राज्य शासनाच्या शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १६ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार निकष ठरवण्यात आले आहेत. शिक्षकांनी केलेले शैक्षणिक काम, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी दिलेले योगदान आणि इतर उल्लेखनीय कामगिरीचा मूल्यांकनात विचार केला जाईल. पुरस्कारासाठी शिक्षक पुरस्कार निवड समिती स्थापन केली जाईल, ज्याचे अध्यक्ष पुणे महापालिकेचे महापौर असतील. ही समिती प्राप्त प्रस्तावांची छाननी आणि मूल्यांकन करून अंतिम शिक्षकांची निवड करेल. निवड झालेल्या ४० शिक्षकांना लॅपटॉप, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल. शिक्षकांच्या चांगल्या कामाची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि इतर शिक्षकांना दर्जेदार, नाविन्यपूर्ण व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी प्रेरणा देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
Source link
पुणे मनपा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रक्रिया सुरू:40 शिक्षकांचा गौरव होणार; 8 ते 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर करता येणार