Headlines

पुणे विषारी दारू प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल:गिरीश महाजनांचे आश्वासन, पीडित कुटुंबियांची घेतली भेट




पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून याबाबत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच विषारी दारूच्या सेवनाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची यशवंत स्मृती रुग्णालय येथे भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. सदर घटना घडलेल्या परिसरात भेट देऊन नागरिकांसोबत संवाद साधला. दारू हे समाजाला लागलेले ग्रहण आहे, हे ग्रहण सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया असे यावेळी आवाहन केले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या बांधवांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल, हा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, सभागृह नेते प्रशांत शितोळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मृतांची संख्या 22 वर पोहोचली दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी उमेश अवचर याला दृष्टी कमी होणे, मळमळ, उच्च रक्तदाबाचा त्रास आणि तोंडातून फेस येणे अशी लक्षणे दिसून आली होती. विशेष म्हणजे आरोपी राधेश्याम प्रजापती ज्या परिसरात अवैध दारू तयार करत होता, त्याच भागातील दारूच्या अड्ड्यावरून उमेशने दारू घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे विषारी दारूचे संकट आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर उरळी कांचनपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. उरळी कांचन परिसरातील राधेश्याम प्रजापती याच्याकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी करत होता. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अवैध अड्ड्यांवर सुमारे 2700 रुपये प्रति कॅन दराने विकली जात होती. मात्र अधिक नफा कमावण्यासाठी त्याने ऑनलाईन मागवलेले मिथेनॉल दारूमध्ये मिसळून त्याचे प्रमाण वाढवले. याच घातक मिश्रणामुळे अनेक नागरिकांचा जीव गेल्याचे समोर आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *