![]()
अमरावती: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी प्रथमच ऑनलाईन समुपदेशनाने करण्यात आल्या. हा अभिनव प्रयोग राज्यात पहिल्यांदाच राबवण्यात आला असून, यामुळे बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण झाली. या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या ४१ कर्मचाऱ्यांपैकी सर्व ४१ कर्मचाऱ्यांची बदली झाली. तसेच, मंडळ अधिकारी संवर्गातील ५ पात्र कर्मचाऱ्यांची, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील ८२ पात्र कर्मचाऱ्यांची, महसूल सहायक संवर्गातील ३९ पात्र कर्मचाऱ्यांची आणि वाहन चालक संवर्गातील ३ पात्र कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी येरेकर यांनी स्वतः बदलीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शंभर टक्के बदल्या समुपदेशनाने झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, समुपदेशनाने बदलीचा हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी ठरला. जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय बदलीस पात्र सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक आणि वाहनचालक अशा सर्व संवर्गांच्या प्रशासकीय बदल्या दिवसभरात समुपदेशनाद्वारे पार पडल्या. धारणी, वरूड, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे यांसारख्या दूरच्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियेसाठी अमरावती मुख्यालयात यावे लागले नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रियेत सहभाग घेतला. यामुळे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि विक्रमी वेळेत पूर्ण झाली. या यशस्वी प्रक्रियेबद्दल कर्मचारी संघटनांनीही आनंद व्यक्त केला आहे. या बदली प्रक्रियेत आरडीसी संतोष काकडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक राजेंद्र कटरे आणि तहसीलदार विजय लोखंडे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
Source link
अमरावतीमध्ये प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांच्या बदल्या:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात 100% समुपदेशनाने प्रक्रिया पूर्ण