![]()
पुण्यातील १५ स्वयंसेवी संस्थांनी आगामी गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करण्याची मागणी केली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची पुणे पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहनही या संस्थांनी केले आहे. वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी पुणे पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. सण, समारंभ आणि उत्सवांमध्ये ध्वनीवर्धकांचा वाढता वापर तसेच निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजामुळे कर्णदोष, रक्तदाबासह विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता संस्थांनी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पुण्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रहिवासी तसेच व्यावसायिक भागांमध्ये ध्वनीची निर्धारित पातळी कायम ठेवणे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रमुख जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सोलापूरमध्ये डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता, त्याच धर्तीवर पुण्यातही डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या संस्थांनी केले आहे. यासाठी महापौर तसेच पुणे महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांना आवाहनपत्र देण्यात आले आहे. गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असला तरी, उत्सवाच्या नावाखाली होणारे कर्णकर्कश ध्वनीप्रदूषण टाळणे आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य आणि विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलण्याची गरज असल्याचे संस्थांनी म्हटले आहे. निसर्ग सेवक संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले की, “सर्वच सण-समारंभ आणि उत्सवांमध्ये ध्वनीची पातळी खूपच वाढते. त्यामुळे अनेकांना कर्णदोष, रक्तदाब अशा विविध व्याधींना तोंड द्यावे लागते. उच्च न्यायालयाने दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यंदा पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.”
Source link
गणेशोत्सव डीजेमुक्त करा:पुणे पोलिसांनी ध्वनीप्रदूषण नियमांची कडक अंमलबजावणी करावी, 15 संस्थांची मागणी