![]()
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेने वापर केला जाईल, असे ते म्हणाले. पुण्यातून एकाच दिवशी २१६ विमानांचे उड्डाण आणि प्रस्थान यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा आणि वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर, स्पाइसजेट, फ्लाय९१, स्टार एअर आणि अलायन्स एअर या विमान कंपन्या पुणे विमानतळावरून सेवा देत आहेत. वाढीव स्लॉटची माहिती सर्व विमान कंपन्यांना देण्यात आली असून, त्यांच्या मुख्यालयांशी समन्वय साधून नवीन शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची तसेच विद्यमान मार्गांवरील उड्डाणांची संख्या वाढवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या संदर्भात, केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी १९ मार्च २०२५ रोजी भारतीय हवाई दलाकडे पुणे विमानतळावरील उड्डाण स्लॉट वाढवण्याची अधिकृत विनंती केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन हवाई दलाने ३० मे २०२५ रोजी पुणे विमानतळावरील दैनंदिन विमान हालचालींची कमाल मर्यादा २२० वरून २३५ पर्यंत वाढवण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी आणि नवीन उड्डाणांसाठी महत्त्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. २ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे विमानतळावर १०७ आगमन आणि १०७ प्रस्थान अशा एकूण २१४ विमान हालचालींची नोंद झाली. त्या दिवशी पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून ३४ शहरांशी हवाई संपर्क उपलब्ध होता. यामध्ये दिल्लीसाठी सर्वाधिक १९, बंगळुरूसाठी १७, चेन्नईसाठी ७, हैदराबाद आणि अहमदाबादसाठी प्रत्येकी ५, तर गोव्यातील मोपा विमानतळासाठी ४ उड्डाणे झाली. सध्या इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेसने दुबई आणि बँकॉक मार्गावरील सेवा पुन्हा सुरू केल्यामुळे वाढीव स्लॉटचा वापर लक्षणीयरीत्या वाढला आहे. आगामी काळात प्रवासी मागणी आणि विमान कंपन्यांच्या नियोजनानुसार आणखी नवीन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले. पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. आयटी, उद्योग, शिक्षण, संरक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांमुळे हवाई प्रवासाची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे विमानतळाची क्षमता अधिक प्रभावीपणे वापरणे, नवीन उड्डाणांना चालना देणे आणि प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. भविष्यातही पुण्याची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक तो सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Source link
पुण्यातून एकाच दिवशी 216 विमानांचे उड्डाण-प्रस्थान यशस्वी:वाढीव स्लॉटचा पूर्ण वापर करून नवीन उड्डाणांना प्राधान्य: केंद्रीय मंत्री मोहोळ