Headlines

पुण्यात एसआयआरविरोधी आंदोलन चिघळले, 88 जण ताब्यात:लष्कर पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांचे आंदोलन, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ठाण्यात निषेध




मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेला आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी पुण्यात शनिवारी (१० ऑक्टोबर) आंदोलन करण्यात आले. लाल महाल चौक आणि शनिवारवाडा परिसरात जमलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण तापले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना लष्कर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या आत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले, तर बाहेर समर्थकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयआर प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्याची परवानगी काही संघटनांनी मागितली होती. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली होती. तरीही शनिवारी दुपारी काही आंदोलक शनिवारवाडा परिसरात रस्त्यावर जमले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ८८ आंदोलकांना ताब्यात घेऊन लष्कर पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्यांचे समर्थक पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले. त्यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. दुसरीकडे, पोलिस ठाण्यात असलेल्या काही विद्यार्थ्यांनीही आंदोलन सुरू केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांपैकी काही युवकांचे पालक पोलिस ठाण्यात दाखल झाले. संबंधित युवकांना पालकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. उर्वरित आंदोलकांवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. एसआयआर प्रक्रियेविरोधातील आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलक रस्त्यावर जमल्याने पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईनंतर पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांचे आंदोलन सुरू झाल्याने परिस्थितीकडे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *